TOD Marathi

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. सुरु असलेल्या पावसाचा गणेश विसर्जनावरही परिणाम झाला. पावसाच्या सुरु असलेल्या तांडवामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. ओढ्या, नाल्यांमध्येही पाणी ओसंडून वाहू लागले आहे. शहराला लागून असलेला कळंबा तलावही पुन्हा सांडव्यावरून वाहू लागला आहे. राजाराम बंधारा मोसमात चौथ्यांदा पाण्याखाली गेला आहे. पंचगंगेची पातळी बंधाऱ्यावर 17 फुटांवर पोहोचली आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी 13 सप्टेंबरपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यातील अनेक धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस होत असल्याने भरलेल्या धरणांमधून नदी पात्रात विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

राधानगरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरणाचा सहाव्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला आहे. त्यामुळे भोगावती नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा व सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणातून सध्या 3 हजार 28 क्युसेकने विसर्ग सुरु आहे.

दुसरीकडे पावसाचा जोर वाढल्याने तुळशी धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. आज सकाळी 10 वाजल्यापासून तुळशी धरणातून सध्या असणारा 500 क्युसेक्स विसर्ग 300 ने वाढ करून 8000 क्युसेक्स करण्यात आला आहे. त्यामुळे नदी काठच्या लोकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढल्याने रुई आणि इचलकरंजी बंधारा पाण्याखाली गेला आहे.

जिल्ह्यातील 9 धरणे 100 टक्के भरली
जिल्ह्यातील तुळशी, कुंभी, पाटगाव, चिकोत्रा, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे आणि कोदे धरण 100 टक्के भरले आहे.