TOD Marathi

गोकुळ दूध संघाची (Gokul Milk Federation general meeting) वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. शौमिका महाडिक (Shaumika Mahadik Kolhapur) आणि महाडिक गटाचे सभासद येण्यापूर्वीच सभागृह संपूर्ण भरलेले होते. त्यामुळे त्यांना पुढे बसण्यासाठी जागा मिळाली नाही आणि यानंतर गोकुळच्या सभेत जोरदार घोषणाबाजीला सुरुवात झाली होती. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
त्यानंतर आता शौमिका महाडिक यांनी आपली भूमिका मांडत सत्ताधारी गटावर टीका केली आहे. या संदर्भात शौमिका महाडिक यांनी फेसबुक पोस्ट केली आहे.
शौमिका महाडिक म्हणतात…
गोकुळच्या वार्षिक सभेत शेवटी जे सत्ताधाऱ्यांकडून आम्हाला अपेक्षित होतं तेच झालं! सत्ताधाऱ्यांनी पळपुटेपणा दाखवला, दूध उत्पादकांच्या नजरेला नजर भिडवून आम्ही विचारलेल्या एकाही प्रश्नाचं उत्तर द्यायचं धाडस त्यांनी केलं नाही. ‘कर नाही त्याला डर कशाला’ अशी आपल्याकडे एक म्हण आहे. परंतु सत्तेत आल्यापासून यांच्या काळ्या कर्तृत्वाची यादी थांबेचना! अक्षरशः संघ ताब्यात घेण्यापासून ते सत्तेचा गैरवापर करत जे काही लाभ उठवता येतील त्यासाठीचे यांचे प्रयत्न जोमाने सुरू आहेत.
परंतु या सगळयाविरोधात दुधउत्पादकांच्या साथीने आवाज उठवून यांना सळो की पळो करून सोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि याठिकाणी प्रत्येक दुधउत्पादकाला मी आश्वस्त करू इच्छिते की, हा जो संघ तुमच्या घामातून उभा राहिला आहे, तो तुमच्या हातातून कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. कारण त्यासाठीची कायदेविषयक आणि रस्त्यावरच्या दोन्ही प्रकारच्या लढाईसाठीची धमक आपण बाळगून आहोत. आज त्याचं फक्त ट्रेलर दाखवलंय! ‘पिक्चर अभी बाकी है!’