काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी कॉंग्रेस पक्ष सोडताना राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप करत काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. (Ghulam Nabi Azad alleged Rahul Gandhi) यानंतर त्यांनी केलेल्या आरोपांची जोरदार चर्चा झाली. या आरोपांविषयी पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला. (Uddhav Thackeray speaks on Rahul Gandhi) यावर उद्धव ठाकरेंनी हे मीदेखील भोगतो आहे, असं उत्तर दिलं. ते सोमवारी मातोश्रीवर पत्रकार परिषदेत बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, “हे मी पण भोगतो आहे. इकडे आनंदी आनंद आहे आणि आनंदाचा कंटाळा आला म्हणून मी घर सोडतो आहे असं कुणीही कधी बोलत नाही. आमच्याकडेही तेच झालं. “गद्दारांना नेमकी गद्दारी कशासाठी केली हा त्यांनाही प्रश्न पडलाय. काल काय बोललो, आज काय बोलतोय, उद्या काय बोलायचं असे प्रश्न त्यांना पडत आहेत. हे होत असतं. राजकारणात हे नवीन नाही,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यावरही आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “कोणताही संभ्रम नाही. शिवाजी पार्कवर शिवसेनेचा म्हणजे आमचाच दसरा मेळावा होणार आहे. संभ्रम निर्माण करणाऱ्यांनी संभ्रम निर्माण करू द्या. शिवसैनिकांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दसऱ्याला शिवतीर्थावर येण्याची तयारी सुरू केलेली आहे.” “मुंबई महानगरपालिकेकडून येणाऱ्या परवानगीचा जो तांत्रिक मुद्दा असेल तो त्यांचा ते पाहतील. मात्र, शिवसेनेचा मेळावा दसऱ्याला शिवतीर्थावरच होणार आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
उद्धव ठाकरे संघ परिवारातील पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेशावर म्हणाले, “दोन दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेडने युती केली. आज संघ परिवारातील लोक शिवसेनेत परिवारात आले आहेत. हिंगोलीतील मातब्बर लोक शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आता हे रोजच चालू आहे.” “मला एका गोष्टीचा अभिमान वाटतो आणि आश्चर्यदेखील वाटतं. सर्वसामान्यपणे सत्ताधारी पक्षांकडे पक्षप्रवेशासाठी रांग लागते. मात्र, आज प्रथमच महाराष्ट्रात वेगळं चित्र दिसत आहे. महाराष्ट्राची माती मर्दांना जन्म देते, गद्दारांना जन्म देत नाही. याची प्रचिती दाखवत ही मंडळी शिवसेनेत येत आहे,” असं ठाकरे यांनी म्हटलं.