TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 27 मे 2021 – कोरोना नंतर आता म्युकरमायकोसिसमुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कोरोनानंतर आता काळ्या बुरशीची म्हणजे म्युकरमायकोसिस आजाराची भर पडलीय. कोरोनापेक्षा घातक म्हणून सिद्ध होऊ लागलेला हा आजार काही राज्यांत महामारी म्हणून घोषित केला आहे. म्युकरमायकोसिस विषयी तज्ज्ञांनी आतापर्यंत विविध मते नोंदवलीत. कोरोनाग्रस्तांवर उपचारादरम्यान झिंक, अँटिबायोटिक्स आणि वाफ यांचा अतिवापर म्युकरमायकोसिसला निमंत्रण देत आहे, अशी बाब एका अभ्यासातून समोर आलीय.

जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात म्युकरमायकोसिसचे रुग्ण अधिक संख्येत आढळत आहेत. कोरोना रुग्णांवर उपचार करत असताना झिंक सप्लिमेंटचे अतिरिक्त सेवन, अँटिबायोटिक्सचा अधिक प्रमाणात वापर आणि वारंवार घेतली जाणारी वाफ या तीन गोष्टी बुरशीच्या वाढीला कारणीभूत ठरतात, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. राजीव जयदेवन यांनी सांगितले.

इंदोर येतील महात्मा गांधी मेमोरियल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधील डॉ. व्ही. पी. पांडे यांनी ४ रुग्णालयातील २१० कोरोना रुग्णांची यासाठी निवड केली होती. डॉ. पांडे यांच्या अभ्यासातून ही बाब समोर आलीय.

अझिथ्रोमायसिन, डॉक्सिसायक्लिन व कार्बापेनेमच्या सेवनामुळे बुरशीचा धोका वाढतो. झिंकचे प्रमाण अधिक असलेल्या वातावरणाचा बुरशी वाढते. मॅमॅलियन पेशी झिंकला दूर ठेवून बुरशी संसर्ग टाळण्याला मदत करतात.

दुसरीकडे वारंवार आणि गरजेपेक्षा जास्त वाफ घेतल्याने म्युकस लेयरचे नुकसान होते. म्युकस लेयरचे नुकसान बुरशीच्या वाढीला कारणीभूत ठरत असते. अशा प्रकारचे १० ते २० टक्के म्युकरमायकोसिसचे रुग्ण भारतात आढळत आहेत.

देशातील ८० टक्के कोरोना रुग्णांना शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी पॅरासिटामॉल आणि इतर पाच ते सात प्रकारची औषधे देतात. तसेच दिवसातून २ ते ३ वेळा वाफ घेण्याचा सल्ला दिला जातो. सध्या कोरोनावर उपचार करण्यासाठी कोणतेही विशिष्ट औषध उपलब्ध नाहीत.

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व लवकर बरे होण्यासाठी झिंक सप्लिमेंटची शिफारस केली जाते. झिंक शरीरातील ३०० पेक्षा जास्त एंजाइम्स सक्रिय करण्यास मदत करते. वाफ घेण्याचे तंत्र कोरोना काळात लोकप्रिय झालंय.

सर्दीपासून मुक्ती मिळविण्यासाठी वाफ घेणे उपयुक्त मानले जाते. पण, न्युमोनिया किंवा फुप्फुसाचे इतर आजार असणाऱ्या नागरिकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वाफ घेऊ नये, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

देशात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे ११ हजार ७१७ रुग्ण आढळले आहेत. या यादीत गुजरात एक नम्बरला आहे. त्यानंतर महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशचा क्रमांक लागतो.

गुजरातमध्ये २ हजार ८५९, महाराष्ट्रात २ हजार ७७० तर आंध्र प्रदेशमध्ये ७६८ रुग्ण आढळलेत. तर दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांतही रुग्णसंख्या वाढतेय, अशी माहिती केंद्रीय रसायने आणि खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी दिलीय.

वेळेवर निदान आणि योग्य उपचारांअभावी रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे म्युकरमायकोसिसला काही राज्यांनी महामारी म्हणून घोषित केले आहे. दुसरीकडे ‘सीडीसी’ने हा आजार संसर्गजन्य नाही, अशी पुष्टी केलीय. देशात म्युकरमायकोसिसचे दरवर्षी रुग्ण आढळतात.

प्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्यांना याची लागण होतेय. याअगोदर अवयव प्रत्यारोपण करणाऱ्या व्यक्ती तसेच कर्करुग्णांमध्ये हा आजार प्रामुख्याने आढळून येत होता. काही वर्षांपूर्वी सार्सची साथ आली होती, त्यावेळी हि म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून आले होते.