TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 28 मे 2021 – पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची जमीन परस्पर विकून सुमारे 15 लाख 80 हजार रुपये लाटल्याप्रकरणी भाजपचे विद्यमान नगरसेवक राजेंद्र किसन लांडगे याला पोलिसांनी अटक केलीय. आरोपी नगरसेवक लांडगे याने संबंधित जमीन स्वतःच्या नावे नसताना बनावट कागदपत्रे तयार करून ती जमीन विकली.

विशेष म्हणजे, ज्यांना ही जमीन विकली आहे. त्यांना संबंधित कागदपत्रे बनावट आहेत, याची माहिती होती. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा नोंदविला आहे. याची माहिती भोसरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी सांगितले कि, आरोपी नगरसेवक राजेंद्र किसन लांडगे याने सर्व्हे क्रमांक 22 मधील पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची 936 चौरस फूट जागा विकली आहे. ही जागा स्वतः च्या मालकीची नसताना आरोपी नगरसेवकाने खोटे नोटराईज कागदपत्रे तयार करून ती जागा मनोज शर्मा आणि रविकांत ठाकूर या नावाच्या व्यक्तींना विकलीय.

याप्रकरणी आरोपीने संबंधित खरेदीदाराकडून सुमार 15 लाख 80 हजार रुपये रक्कम लाटली आहे. याप्रकरणी नवनगर विकास प्राधिकरणाचे सहाय्यक अभियंता एस. एस. भुजबळ यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी आरोपी नगरसेवक राजेंद्र किसन लांडगे याच्यासह जमीन विकत घेणारे मनोज महेंद्र शर्मा व रविकांत सुरेंद्र ठाकूर या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित जमीन प्राधिकरणाची आहे, हे माहीत असूनही त्यांनी ही जागा विकत घेऊन त्यावर बेकायदेशीर बांधकाम उभं केलं आहे. त्यामुळे मनोज महेंद्र शर्मा व रविकांत सुरेंद्र ठाकूर विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी नगरसेवक राजेंद्र किसन लांडगे व शर्मा या दोघांना अटक केली आहे. तर, यातील तिसरा आरोपी रविकांत ठाकूर फरार आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत.