TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 27 मे 2021 – भारतात कोरोनाची आकडेवारी लपवली जात आहे, यावरून देशात राजकीय वर्तुळात टीका टिप्पणी होत आहे. मात्र, याची दखल जागतिक पातळीवर घेतली आहे. त्यामुळे कोरोनामुळे भारतात 42 लाख जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 70 कोटी लोकांना कोरोना झालेला आहे. असा दावा ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने केला आहे.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आत्तापर्यंत देशात सुमारे 2 कोटी 71 लाख लोकांना कोरोना संसर्ग झाला आणि त्यातील 3 लाख 7 हजारांवर रुग्णांचा मृत्यू झाला, अशी केंद्र सरकारची आकडेवारी आहे. मात्र, अमेरिकेच्या दैनिक ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने केलेला दावा आणिभारताच्या मोदी सरकारची आकडेवारी यावरून संभ्रम आणखी वाढला आहे.

भारतात कोरोनामुळे नेमके किती जणांचा मृत्यू झाला आहे? पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत हाहाकार माजला आहे. याचा अभ्यास करण्यासाठी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने अनेक तज्ञांच्या मदतीने अहवाल तयार केलाय. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीपेक्षा ‘न्यूयॉर्क टाइम्स’ची आकडेवारी कित्येक पटीने अधिक आहे. 24 मे पर्यंतची ही आकडेवारी धक्कादायक आहे.

भारतात एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यास त्याचे 20 जणांना संसर्ग होतो. तसेच 0.30 रुग्णांचा मृत्यू झाला असे गृहित धरले, तरी सरकारी आकडेवारीपेक्षा पाचपट अधिक मृत्यू झालेत, असे म्हणता येईल, असे सेंटर फॉर डिसीज डायनामिक्सचे संचालक डॉ. रमनन लक्ष्मीनारायण यांनी सांगितले आहे .

तज्ञांनी हिंदुस्थानातील कोरोनाला तीन भागात विभागले असून यात सामान्य परिस्थिती, वाईट स्थिती आणि अत्यंत वाईट स्थिती असे वर्गीकरण केले आहे.

24 मेपर्यंत केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार देशात सुमारे 2 कोटी 7 लाख लोक कोरोना संक्रमित झाले. आतापर्यंत सुमारे 3 लाख 7231 जणांचा मृत्यू झाला, असे म्हटले आहे. पण, ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने हा दावा फेटाळला आहे. सामान्य स्थितीचा विचार केला तर 40 कोटींवर लोकांना कोरोनाची लागण झाली आणि 6 लाख रुग्णांचा मृत्यू झालाय.

कोरोनाची वाईट स्थितीचा अभ्यास केल्यास हिंदुस्थानात 56 कोटी 9 लाख लोकांना संसर्ग झाला आणि 16 लाख जणांचा मृत्यू झाला. अत्यंत वाईट स्थिती पाहता हिंदुस्थानातील अर्धी जनता तब्बल 70 कोटी लोक कोरोना संक्रमित झाले आणि 42 लाख लोकांचा मृत्यू झाला असा खळबळजनक दावा केला आहे.

‘सीरो ‘ सर्व्हेत अधिक रुग्णसंख्या:
भारतात ही तीनदा देशव्यापी ‘सीरो’ सर्व्हे केला आहे. लक्षणे दिसत नसली तरी कोरोना संसर्ग झाल्यानंतर विशिष्ट अँटीबॉडी शरीरात तयार होतात. त्याचा अभ्यास या सर्व्हेत केला जातो. या सर्व्हेला काही मर्यादा असल्या तरी संसर्गाची आकडेवारी समजते, असे ‘स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ’चे प्राध्यापक डेनवीन बर्गर यांनी सांगितले आहे. ‘सीरो’ सर्व्हेची आकडेवारी सरकारने नोंदविलेल्या रुग्णसंख्येपेक्षा अधिक आहे.