TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 9 मे 2021 – कोरोनामुळे अनेकांचे हाल झाले आहेत. तर अनेकांचे हाल होत आहेत. या काळात अनेकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशात आता पहिल्यांदा गर्भवती महिलांसाठी जानेवारी 2017 मध्ये सुरू केलेली पंतप्रधान मातृ वंदना योजना वरदान ठरतेय. आतापर्यंत लाखो-करोडो महिलांनी या योजनेसाठी आपलं नाव नोंदवलंय आणि या योजनेचा लाभ घेतला आहे. केंद्र सरकार गर्भवती महिलांच्या खात्यात 5000 रुपये जमा करत आहे. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा? हे आज आपण जाणून घेऊया.

देशभरात महिला आणि नवजात बालकांच्या भविष्याबद्दल केंद्र सरकारने PMMVY ही योजना बनवलीय. या योजनेंतर्गत गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना 5000 रुपयांची आर्थिक मदत केली जातेय. 5000 रुपये तीन हप्त्यात दिले जात आहेत. मात्र, 19 वर्षाच्या आतील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

जाणून घ्या, कसे आणि कधी मिळणार पैसे –
पंतप्रधान मातृ वंदना योजनेंतर्गंत पहिल्यांदा गर्भवती झाल्यानंतर पोषणासाठी गर्भवती महिलेच्या खात्यात 5000 (पाच हजार रुपये) मिळतात. याचा पहिला हप्ता 1 हजार रुपये गर्भधारण झाल्यानंतर 150 दिवसांच्या आत मिळतो तर, दुसरा हप्ता 2000 रूपये 180 दिवसांच्या आत मिळतो आणि तिसरा हप्ता बाळाच्या जन्मानंतर त्याच्या पहिल्या लसीकरणाअगोदर मिळतो.

‘या’ महिलांना मिळतोय लाभ –
या योजनेचा लाभ त्या महिलांना मिळतो ज्या दैनंदिन मजुरीचं काम करतात किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. गर्भवती असताना मजुरी न करता आल्याने होणार नुकसान काही प्रमाणात कमी करणं, हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ही आर्थिक मदत मिळाल्याने गर्भवती महिलांना आराम करण्याचा वेळ मिळतो. या योजनेचा लाभ त्या महिलांना मिळत नाही, ज्या केंद्र किंवा राज्य सरकारसोबत कोणत्याही उपक्रमात जोडल्या गेलेल्या आहेत.

अशी करा ऑनलाईन नोंदणी –
मातृत्व वंदना योजना 2021 अंतर्गत केंद्र सरकारने नोंदणीची प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. अर्थात लाभार्थी स्वतः ऑनलाईन नावनोंदणी करू शकतात. यासाठी सर्वात आधी लाभार्थ्याला www.Pmmvy-cas.nic.in या साईटवर लॉगिन करावे. आणि आपलं नाव नोंदवावं. ही प्रकिया ऑनालाईन आहे.