टिओडी मराठी, दि. 5 सप्टेंबर 2021 – सध्या कोरोनामुळे अनेकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यातच पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्यात. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सामान्यांना फटका बसत आहे. अशात पेट्रोल-डिझेलवर भाजपच्या एका आमदाराने अजब दावा केलाय.
देशामध्ये सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होतेय. या दरवाढीला पूर्णपणे तालिबान जबाबदार असल्याचे कर्नाटकातील हुबळी-धारवाड मतदारसंघाचे भाजपचे आमदार अरविंद बेल्लाड यांनी म्हटलंय. तालिबानने अफगाणिस्तानमध्ये कब्जा केल्यामुळे आता देशात इंधन दरवाढ झालीय, असा दावा हि आमदारांनी केला आहे.
कर्नाटकातील हुबळी-धारवाड मतदारसंघाचे अरविंद बेल्लाड आमदार आहेत. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते नेहमी वादात राहतात. आता पुन्हा त्यांनी अजब दावा केल्याने आता त्यांची चर्चा आता संपूर्ण कर्नाटकमध्ये सुरू झालीय.
कोरोना काळापासून केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ करण्यास सुरूवात केली होती. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलच्या किंमती कमी झाल्यानंतर हि इंधन दरवाढ कमी झाली नसल्याने सामान्य माणसांच्या खिश्याला मोठा फटका बसत आहे.