TOD Marathi

एक्झिट पोल्सने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे हिमाचल प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत मिळत आहेत. सकाळी हिमाचल प्रदेशमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली (Counting of votes started in Himachal Pradesh in the morning). अगदी सुरुवातीच्या क्षणापासून याठिकाणी भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. आतापर्यंत समोर आलेले कल पाहता हिमाचल प्रदेशात भाजप ३४ आणि काँग्रेस ३१ जागांवर आघाडीवर आहे (Going by the trend so far, in Himachal Pradesh BJP is leading in 34 seats and Congress in 31 seats). तर आपचा एकही उमेदवार आघाडीवर नाही. अन्य पक्षाचे उमेदवार तीन जागांवर आघाडीवर आहेत. गेल्या दोन तासांमध्ये हिमाचल प्रदेश निवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेस आणि भाजप आळीपाळीने आघाडी घेताना दिसत आहेत. त्यामुळे संध्याकाळपर्यंत याठिकाणी पुन्हा त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर अंतिम कल हाती येण्यापूर्वी भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने आता हिमाचल प्रदेशात आता सत्तास्थापन करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. भाजपचे महासचिव विनोद तावडे (Vinod Tawde) यांना यासाठी शिमला येथे पाठवण्यात आले आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेशातील सत्तास्थापनेत, यासंदर्भातल्या वाटाघाटींमध्ये विनोद तावडे हे महत्त्वाची भूमिका बजावतील, असे चित्र आहे. केंद्रीय नेतृत्त्वाने नक्की काय मेसेज विनोद तावडे यांना देऊन हिमाचल प्रदेशात पाठवले आहे, हे स्पष्ट झालं नसलं तरी भाजपने मात्र सत्ता स्थापनेच्या तयारीला सुरुवात केल्याचे दिसत आहे.

भाजप आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांनी पाठिंबा मिळवण्यासाठी आधीपासूनच हालचाली सुरु केल्या होत्या. निवडून येण्याची चिन्हे असलेल्या अपक्ष उमेदवारांशी दोन्ही पक्षांकडून संपर्क साधला जात आहे. हिमाचल प्रदेशमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला आणखी किमान ३५ आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. सध्याची परिस्थिती पाहता याठिकाणी काँग्रेस आणि भाजपला ३३ अशा समान जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्तास्थापनेत आता अपक्षांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.