TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 5 सप्टेंबर 2021 – महापालिकेच्या कात्रज येथील स्वर्गीय राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये लवकरच पुणेकरांना ‘जिराफ’ दर्शन होणार आहे. त्यासाठी खंदक तयार करण्याचे काम महापालिकेकडून हाती घेतले आहे. हे काम पूर्ण होत असताना जिराफ मागविण्यासाठी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणास प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे, असे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले आहे.

प्राणी संग्रहालयामध्ये सध्या सुमारे 7 कोटी रुपये खर्चून वेगवेगळे खंदक उभारण्यात येत आहे. त्यात निलगाय तसेच जिराफाच्या खंदकासह इतर प्राण्यांच्या खंदकाचे काम सुरूय. महापालिकेच्या कात्रज येथील प्राणी संग्रहालयामध्ये सर्पोद्यानासह प्राणी संग्रहालय आहे. तीनशेंहून अधिक वेगवेगळ्या जातीचे प्राणी आहेत.

तर महापालिकेकडून दरवर्षी त्यात, नव्या प्राण्यांची भर घातली आहे. काही दिवसांपूर्वी पालिकेने औरंगाबाद येथून वाघ आणले आहेत. त्यापूर्वी अशियायी सिंह, कोल्हा आणला आहे. त्यानंतर आता महापालिकेकडून जिराफ आणण्याची तयारी सुरू केली आहे.

महापालिकेच्या उद्यान विभागास सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे हे प्राणीसंग्रहालय आहे. मागील दीड वर्षांपासून करोना संकटामुळे ते बंद आहे. शहरातील करोनाची साथ नियंत्रणामध्ये आल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून शहरातील मर्यादित उद्याने सुरू केली असली तरी, या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता अद्याप ती उघडण्याचा निर्णय झाला नाही. तसेच देशातील कोणतीही प्राणी संग्रहालये सुरू न झाल्याने पालिकेनेही ते बंदच ठेवण्याचा निर्णय घेतलाय.