TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 5 सप्टेंबर 2021 – छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांचे वडील नंदकुमार बघेल यांच्या विरोधात छत्तीसगड पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. ब्राम्हण समाजाच्या विरोधात त्यांनी प्रक्षोभक वक्‍तव्य केलं होतं, त्या अनुषंगाने हा गुन्हा दाखल केला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री बघेल यांनी म्हटले आहे की, आमच्या राज्यामध्ये कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. त्यामुळे कायद्यानुसार हा गुन्हा दाखल केला आहे.

नंदकुमार बघेल यांनी अलीकडे ब्राम्हण जातीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केलं होतं. त्यांनी म्हटले होती मी सर्व गावकऱ्यांना असे आवाहन करतो की, त्यांनी ब्राम्हणांना आपल्या गावात प्रवेश देऊ नये. या सर्व ब्राम्हणांना त्यांच्या मूळ ठिकाणी म्हणजे व्होल्गा नदीच्या काठी घालवावे.

त्यावर ब्राम्हण आणि अन्य समाज बांधवांनी आक्षेप घेतला. सर्व ब्राम्हण समाज संघटनेतर्फे नंदकुमार बघेल यांच्या विरोधात डीडीनगर पोलीस ठाण्यामध्ये शनिवारी तक्रार दाखल केली आहे.

त्यावरून पोलिसांनी नंदकुमार बघेल यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. त्यावर मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, आमच्या राज्यात कायदा सर्वांना समान आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठा असू शकत नाही, त्यामुळे त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा योग्य आहे. माझे वडिल 86 वर्षाचे आहेत आणि ते एका मुख्यमंत्र्यांचे वडील आहेत म्हणून त्यांना माफ किंवा दुर्लक्षित करता येणार नाही.

माझ्या वडिलांनी समाजातील एका घटकाच्या विरोधात वक्‍तव्य केलंय ते चुकच आहे. आमचे सरकार सर्वच समाजघटकांचा सन्मान करते असेही त्यांनी नमूद केलं. आपल्या वडिलांचे हे विधान समाजात विभाजन पसरवणारे आहे, त्यामुळे आपल्याला दु:ख झालं आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी नोंदवली आहे.