TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 2 जुलै 2021 – राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, विधानसभा अध्यक्ष निवड करावी आदी विषयांसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 24 जून रोजी पत्र पाठविले होते. यावर मुख्यमंत्र्यांनी आज राज्यपालांना दोन दिवसांचे अधिवेशन का बोलावले? याचा खुलासा करत उत्तर पत्राद्वारे दिले आहे.

विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक २२ जून २०२१ रोजी पार पडली. कोरोनामधील डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या टास्क फोर्समधील तज्ञांनी व्यक्त केलेली चिंता आणि केंद्र सरकारने दिलेला सावधगिरीचा इशारा यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

त्यानुसार, केवळ ज्या कामकाज सल्लागार समितीला अधिवेशनाचा कालावधी ठरविण्याचा अधिकार आहे, त्याच समितीने कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून सन २०२१ च्या द्वितीय (पावसाळी) अधिवेशनाचा कालावधी दि.५ जुलै ते ६ जुलै,२०२१ असा दोन दिवसांकरीता निश्चित केला आहे, असे या पत्रात म्हटले आहे.

राज्यात सध्या असलेली कोरोनाची दुसरी लाट अजून ओसरलेली नाही. त्यातच तिसऱ्या लाटेचीही तीव्र शक्यता वर्तविली आहे. हि लाट राज्यापुरतीच नव्हे तर संपूर्ण देशात येणार आहे. या संभाव्य लाटेच्या दाहकतेबाबत देखील या तज्ञांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

भारतीय संविधानाच्या कलम १७८ तसेच महाराष्ट्र विधानसमा नियम, ६ अन्वये विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाते. तथापि, याकरीता विवक्षित कालमर्यादा निश्चित केलेली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये अधिक काळ अधिवेशन घेता येणे शक्य झालेले नाही.

महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील बहुतांश राज्यातही अल्प कालावधीची अधिवेशने घेतलेली आहेत. त्यामुळे राज्यात अध्यक्षांची निवडणूक घेता आलेली नाही. या परिस्थितीत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार सोपविलेला आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनही त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेले आहे. यामुळे निवडणुकीअभावी कोणत्याही सांविधानिक तरतूदीचा भंग झालेला नाही अथवा घटनात्मक अडचण निर्माण झालेली नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.