TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 2 जुलै 2021 – देशात घरगुती गॅस, पेट्रोल – डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र, केंद्र सरकार याकडे लक्ष न देता जनतेची दिशाभूल करून इतर मुद्दे समोर ठेवत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने वाढवलेल्या घरगुती गॅस, इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आज तसेच उद्या राज्यभर आंदोलन पुकारले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. मात्र, यावेळी कोरोनाचे नियमांचं पालन केले जाईल, असेही सांगितले आहे.

तुमचे सिलेंडर आमच्या घराच्या सुखसमृद्धीत आणि शांतीत आग लावत असेल तर यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन छेडल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा जयंत पाटील यांनी दिला आहे.

सामान्य जनतेचा आक्रोश केंद्र आणि राज्यस रकारसमोर मांडला पाहिजे. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळून राज्यात आंदोलन करावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

गृहिणींच्या बजेटमध्ये मोठं संकट केंद्र सरकारने निर्माण केलं आहे. अचानकपणे सिलेंडरचे दर २५ रुपयांनी वाढविले. २० दिवसाला ८०९ रुपये तर महिन्याला दीड हजार रुपये सिलेंडरमागे सर्वसामान्य जनतेला द्यावे लागणार आहेत.

याचा निषेध करताना जयंत पाटील यांनी आज आणि उद्या राज्यातील जिल्ह्यासह तालुक्यात आंदोलन केले जाणार आहे, असे स्पष्ट केले आहे.

‘जगावं की मरावं’? हा प्रश्न हेम्लेटच्या नाटकामध्ये विचारला होता.आता नरेंद्र मोदींच्या केंद्र सरकारने महागाई, इंधन दरवाढीने सर्वसामान्यांसह गृहिणींचे बजेट कोलमडून टाकले आहे. म्हणून ‘जगावं की मरावं?’ या प्रश्नाचे उत्तर ‘मन की बात’ मध्ये शोधले तर ते ‘मरावंच’ असे दिसतंय, असेही जयंत पाटील म्हणाले आहेत.