TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 14 ऑगस्ट 2021 – महाराष्ट्र राज्यातील त्या आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तीवरून ठराविक काळात निर्णय घेणे हे राज्यपालांचे घटनात्मक कर्तव्य आहे. ते त्यांनी विनाविलंब पार पाडावे, असा सल्ला उच्च न्यायालयाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिलाय. यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केलीय.

यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दबाव असल्याचा आरोप केला आहे. याबाबत राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना विचारले असता, राज्यपालांचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे त्यामुळे ते सकारात्मक निर्णय घेतील, परंतू त्यांच्यावर अदृश्य दबाव असल्याचा टोला लगावत भुजबळांनी केंद्रावर निशाणा साधला.

आता राज्यपाल कोश्यारी यांनी थेट दिल्ली गाठत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. त्यांच्या या भेटीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्याचं दिसतंय. ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात येतंय.

अमित शहा यांनी पुष्पगुच्छ देऊन राज्यपाल कोश्यारी याचं स्वागत केलं आणि या दोघांमध्ये विस्तृत चर्चा झाल्याचं देखील समोर येतंय.