TOD Marathi

टिओडी मराठी, लखनऊ, दि. 14 ऑगस्ट 2021 – उत्तर प्रदेश राज्याच्या राजकारणात माजी भारतीय पोलीस सेवा अधिकारी अमिताभ ठाकूर हेही उतरणार आहेत. आगामी काळात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे अमिताभ ठाकूर यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधामध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केलीय.

उत्तर प्रदेश केडरचे आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकूर अकाली निवृत्त झाले आहेत. ठाकूर यांनी शनिवारी जारी केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, आगामी विधानसभा निवडणूक ते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात लढविणार आहेत.

यावेळी ठाकूर म्हणाले, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये सर्व अलोकशाही, अराजक, दडपशाही आणि भेदभावपूर्ण कामे केली. यामुळे मुख्यमंत्र्यांविरोधात ते लढतील.

मग, योगी आदित्यनाथ कोठूनही लढले तरी ते त्या ठिकाणी लढणार आहेत. हि त्यांच्यासाठी तत्त्वांची लढाई आहे, ज्यात ते चुकीच्या गोष्टींना विरोध व्यक्त करतील.

गृह मंत्रालयाच्या निर्णयाचे पालन करून माजी आयपीएस अमिताभ ठाकूर यांना 23 मार्च रोजी अनिवार्य सेवानिवृत्ती दिली होती. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशात म्हटले आहे की, ठाकूर ते सेवेच्या उर्वरित मुदतीसाठी कायम ठेवण्यास योग्य नाहीत. जनहितार्थ, अमिताभ ठाकूर यांना त्यांची सेवा पूर्ण होण्यापूर्वी प्रभावाने अकाली निवृत्ती दिली जात आहे, असेही त्यामध्ये म्हटले होते.