टिओडी मराठी, मुंबई, दि. 15 ऑगस्ट 2021 – मुंबई विद्यापीठाला बॉम्बस्फोटने उडविण्याची धमकी बीकॉमच्या विद्यार्थ्याने दिल्याचं समोर आलं आहे. बीकॉम अभ्यासक्रमाचा निकाल लवकर न लावल्यास कॅम्पस बॉम्बने उडवण्याची धमकी या विद्यार्थ्यांनं दिली होती.
प्रलंबित निकालामुळे मानसिक तणावात असलेल्या या विद्यार्थ्याने शिवीगाळ करत ईमेल मुंबई विद्यापीठाला पाठवला होता. सायबर पोलिसांनी या विद्यार्थ्यांना शोध घेतला. त्यानंतर या विद्यार्थ्याला वॉर्निंग व नोटीस देत सोडून दिलंय.
मुंबईतील बीकेसी पोलीस स्टेशनमध्ये मुंबई विद्यापीठाला 9 आणि 10 जुलै रोजी आलेल्या ईमेल प्रकरणी तक्रार दाखल केली होती. यानंतर सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला.
यावेळी पोलिसांना या विद्यार्थ्याचा शोध लागला. कॉमर्सच्या विद्यार्थ्याने सायबर कॅफेमधून विद्यापीठाला हा धमकीचा ई-मेल पाठवला होता.
तपासादरम्यान हा ईमेल खोट्या तपशीलांच्या आधारे तयार केला होता. तसेच खोट्या ई-मेल आयडीवरुन पाठवलेला बनावट मेल आहे, असेही समोर आलं आहे. पोलिसांनी तपास करुन आरोपीला अटक केली होती.
मात्र, आरोपी हा बीकॉमचा विद्यार्थी असून सध्या मानसिक तणावात आहे, असे समजल्यामुळे त्याला नोटीस देऊन सोडून दिलं आहे.