टिओडी मराठी, पुणे, दि. 22 मे 2021 – ऐन सणाच्या काळात दुकाने बंद असल्याने शहरातील व्यापारी वर्ग संकटात सापडला आहे. मागील दीड महिने शहरातील व्यापारी पेठ बंद आहेत. आता 31 मे नंतर शहरातील व्यापारी दुकाने खुली करण्यास मुभा द्या, अशी मागणी पुणे व्यापारी महासंघाकडून केली आहे.
याबाबत निवेदन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, सचिव महेंद्र पितळीया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे.
करोनाचा संसर्ग वाढल्यामुळे पाच मेपासून शहरातील जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद केली आहेत. गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया तसेच रमजान ईद या सणांच्या कालावधीत व्यापारी दुकाने बंद होती.
सणासुदीच्या काळामध्ये व्यापार बंद असल्याने व्यापारी आणि पर्यायाने कर्मचारी वर्गासमोर संकट उभे राहिले आहे. राज्यातील व्यापार क्षेत्राला कोट्यवधी रुपयांचा फटका बसलाय, असे रांका आणि पितळीया यांनी सांगितले.
दीड महिने दुकाने बंद आहेत. या कालावधीत व्यापाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचा विचार केला. त्यांना वेतन दिले. परंतू, यापुढील काळात कर्मचाऱ्यांचचे वेतन देणे अशक्य होणार आहे. व्यापार बंद असल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन कसे करणार?, हा देखील प्रश्न आहे. पर्यायाने अनेकांवर बेराजगाराची वेळ येईल.
व्यापारी, कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय संकटामध्ये सापडले आहेत. ३१ मे नंतर निर्बंध शिथिल करण्याची आवश्यकता आहे. दुकाने खुली ठेवण्यास परवानगी देण्याची गरज आहे. नियमावलीचे पालन करून व्यापार सुरू केला जाईल.
बाजारपेठांवर निर्बंध असताना ई-कॉमर्स कंपन्याकडून चैनीच्या वस्तुंची विक्री सुरू आहे. व्यापाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनास सहकार्य केले आहे, असे त्यांनी सांगितले आहे.