TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 11 जून 2021 – पुण्यात येत्या सोमवारपासून दुकाने, मॉल आणि हॉटेलसाठी नवे नियम लागू केले जाणार आहेत. नव्या नियमानुसार हॉटेलं रात्री 10 वाजेपर्यंत तर दुकाने सायंकाळी 7 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत.

पुण्यातील कोरोना स्थितीबाबत शुक्रवारी आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नव्या नियमांबाबत माहिती दिली. पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत आहे, त्यामुळे निर्बंधांमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.

पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयातील नुतनीकरण केलेल्या इमारतीचे उद्घाटन करुन कामाची पाहणी केली. यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर, पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, श्रीमती स्वप्ना गोरे, मितेश घट्टे, प्रियांका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर यांसह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी यांसह कर्मचारी उपस्थित होते.

इमारत पाहणीनंतर पुण्यातील विधानभवनामध्ये कोरोना आढावा बैठक घेतली होती. पुण्यात पॉझिटिव्हीटी 5 टक्क्यांच्या आत आलाय. त्यामुळे निर्बंध थोडे आणखी शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. तर पिंपरी चिंचवडचा पॉझिटिव्हीटी दर हा 5 टक्क्यांच्या वर असल्याने तिथले निर्बंध शिथील करण्याबाबत अजून निर्णय घेतलेला नाही, असे पवार यांनी सांगितले.

पुणे ग्रामीणमध्ये पॉझिटिव्हीटी दर सुमारे 12 टक्के असल्याने तिथले ‘निर्बंध जैसे थे’ ठेवणार आहे. पुणे शहरातील थिएटर आणि नाट्यगृह बंद राहतील. पुढील आठवड्यात कोरोनाबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर थिएटर आणि नाट्यगृह ही सुरू करायची अथवा नाही, याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे पवार यांनी स्पष्ट केले. पुण्यात अभ्यासिका आणि वाचनालये सोमवारपासून सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे, असेही त्यांनी सांगितले.