TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 22 मे 2021 – कोविड रुग्णालयांत आगीची दुर्घटना घडू नये, यासाठी प्रशासनाकडून केलेल्या फायर ऑडिटमध्ये ८८ रुग्णालयांत त्रुटी आढळल्या आहेत. खासगी रुग्णालयांना फायर ऑडिटमधील त्रुटी दूर करण्यासाठी एक ते तीन आठवड्यांचा कालावधी दिला आहे.

नुकतीच विरारमधील कोविड रुग्णालयामध्ये आगीच्या दुर्घटनेत जीवित हानी झाली. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात फायर ऑडिट केले जात आहे.

अशा दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित रुग्णालयांनी तातडीने दुरुस्ती करून घ्यावी, याबाबत संबंधित रुग्णालयांना सूचना दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून दिली आहे.

फायर ऑडिटमधील रुग्णालये :
एकूण ७३७ सरकारी आणि खासगी रुग्णालयांचे फायर ऑडिट होणे आवश्यक आहे. मात्र, त्यापैकी ६४८ रुग्णालयांचे ऑडिट पूर्ण आहे. तर, उर्वरित ८९ रुग्णालयांचे ऑडिट करण्यात येणार आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीतील १९२ रुग्णालयांपैकी ५७, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील १३२ पैकी ९ रुग्णालयांचे फायर ऑडिट प्रलंबित आहेत.

याबाबत रुग्णालयांना त्रुटी दूर करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्याचे उल्लंघन झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून कारवाई केली जाईल. सरकारी आणि ग्रामीण रुग्णालयांना दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीमधून (डीपीसी) निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे, असे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी सांगितले आहे.

 • रुग्णालयामध्ये आढळलेल्या त्रुटी:
  रुग्णालयातून प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग
  इलेक्ट्रिक वायरिंगची धोकादायक बाब
  वातानुकूलित यंत्रणेचा क्षमतेपेक्षा जास्त वापर
  फायर एक्सटिंगविशर बंद अवस्थेत
  बेड वाढल्यामुळे विजेच्या लोडपेक्षा जास्त वापर
  आग आटोक्यात आणण्यासाठी टाकीत पाण्याची उपलब्धता कमी अथवा नसणे
  प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा आढळतोय अभाव
  ऑक्सिजनसह इतर ज्वलनशील पदार्थाची सुरक्षितता

त्रुटी आढळलेली रुग्णालये पुढीलप्रमाणे :
गंभीर त्रुटी – ८८ रुग्णालये,
मध्यम त्रुटी – २६९ रुग्णालये,
सामान्य त्रुटी – २९१ रुग्णालये