टिओडी मराठी, मेक्सिको, दि. 22 जून 2021 – अमेरिकन सीमेजवळील मेक्सिकन शहराच्या रेनोसामध्ये वाहनांवर सवार हल्लेखोरांनी नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत सुमारे 18 जणांचा मृत्यू झाला आहे, असे समजते. याबाबत एका वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, हातात शस्त्रे असलेले हे हल्लेखोर वाहनांवर सवार होते आणि या लोकांनी नागरिकांवर गोळीबार सुरू केला.
यानंतर मेक्सिकन आर्मी, नॅशनल गार्ड, राज्य पोलीस आणि इतर एजन्सी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. याबाबत अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, की त्यांनी दोन महिलांचे अपहरण करुन त्यांना आपल्या वाहनात घेऊन जात असलेल्या एका व्यक्तीला अटक केलीय, तसेच तीन वाहने जप्त केली आहेत.
यानंतर गोंधळ उडाल्याचे सुरक्षा दलाने सांगितले आहे. यावेळी सुरक्षा दलाने ४ संशयितांना ठार केलं आहे. यात सीमा पुलाजवळ ठार झालेल्या व्यक्तीचा समावेश आहे. शनिवारी दुपारी हा हल्ला सुरू झाला असून सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांत रेनोसाच्या रस्त्यांवर मृतदेह विखुरलेल्या अवस्थेत दिसत आहेत.
नागरिकांच्या सुरक्षेच्या मागणीसाठी रेनोसाचे महापौर माकी एस्तेर ऑर्टिज डोमिंग्यूझ यांनी ट्विटरवरुन मागणी केलीय. तामाउलिपासचे राज्यपाल फ्रान्सिस्को ग्रॅसिया कॅबेझा डी वका यांनी रविवारी या घटनेचा निषेध केला आहे. तसेच मृत्यू झालेल्या नागरिकांबद्दल शोक व्यक्त केला. हल्ल्यामागील हेतू तपासला जाईल, असे यावेळी ते म्हणाले.