TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 22 जून 2021 – बॉम्बने मुंबई येथील मंत्रालय उडवण्याची धमकी देणाऱ्यास पोलिसांनी अटक केलीय. ई-मेलद्वारे त्याने ही धमकी दिली होती. पुण्यात घोरपडीमधून या व्यक्तीला अटक केली असून त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. या व्यक्तीविरोधात मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

शैलेश शिंदे असं बॉम्बने मंत्रालय उडवण्याची धमकी देणाऱ्याचे नाव आहे.

सोमवारी संध्याकाळी शैलेशने हा ई मेल केला होता. मुलीचे शाळेत अॅडमिशन न झाल्याने त्याने गृह विभागाला धमकीचा ई-मेल केल्याचं समोर आलं आहे. सोमवारी संध्याकाळी हा ई-मेल आल्यानंतर डॉगस्कॉडद्वारे मंत्रालयात शोध घेतला. मात्र, याठिकाणी कोणतीही स्फोटक वस्तू आढळलेली नाही. मात्र, खबरदारी म्हणून या परिसरात बंदोबस्त वाढवला आहे.

मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची माहिती दिली असून सध्या शैलेश मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे. मंत्रालय बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याला अटक केली होती.

यानंतर त्याच्याविरोधात मरीन ड्राईव्ह पोलिसांत गुन्हा दाखल करत त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. शैलेशनं मुलीचे शाळेत प्रवेश न झाल्याने हा मेल पाठवला आहे, असे प्राथमिक तपासात समोर आलंय.