TOD Marathi

Taliban ने अमेरिकेला दिली धमकी ; 31 August पर्यंत सैन्य मागे घ्या अन्यथा, परिणामाला सामोरे जा

टिओडी मराठी, काबुल, दि. 23 ऑगस्ट 2021 – तालिबानने अफगाणिस्तान देशावर कब्जा केल्यानंतर तेथून लोक पलायन करत आहेत. अमेरिका आणि अन्य देशांच्या सैन्याने अफगाणिस्तानमधून काढता पाय घेतलाय. मात्र, बचाव मोहीम अद्याप सुरू असल्याने अमेरिका आणि नाटोचे सैनिक काबुल विमानतळावर तैनात आहेत. यावेळी तालिबानने अमेरिकेला धमकी दिली आहे.

तालिबानचा प्रवक्ता सोहेल शाहीनने सोमवारी कतारमध्ये असे सांगितले की, जर अमेरिकेने आपल्या सैनिकांना माघारी बोलावण्यात उशीर केला तर त्याचे परिणाम अमेरिकेला वाईट होतील. अमेरिकन सैनिकांच्या माघारीसाठी ३१ ऑगस्ट हीच डेडलाईन तालिबानकडून घोषित केली आहे.

एकीकडे तालिबानने जगातील अनेक देशांना त्यांच्या काबुलमधील वकिलाती सुरू ठेवण्याचे आवाहन केलं आहे. तसेच त्यासाठी सुरक्षा देण्याचीही घोषणा केलीय. मात्र, दुसरीकडे तालिबानने अमेरिकेला मात्र निर्धारित केलेल्या डेडलाईनमध्ये अफगाणिस्तान सोडण्याचा इशारा दिलाय.

३१ ऑगस्टपर्यंत रेस्क्यू मिशन पूर्ण करून आपल्या सैनिकांना माघारी बोलावू, असे अमेरिकेने सांगितले होते. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी जर मोहीम पूर्ण झाली नाही तर अमेरिकन सैनिक ३१ ऑगस्टनंतरही अफगाणिस्तानमध्ये राहू शकतात, असे संकेत दिले होते.

त्याअगोदर ११ सप्टेंबरच्या आत अफगाणिस्तान सोडण्याची घोषणा अमेरिकेने केली होती. अमेरिकन सैन्य माघारी परतण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला होता. मात्र, आताही सुमारे ५ हजारांहून अधिक अमेरिकन सैनिक काबुल विमानतळावर उपस्थित आहेत. तसेच बचाव मोहिमेला तडीस नेत आहेत. त्याशिवाय नाटो देशांचे सैनिकही इथून आपापल्या देशांच्या नागरिकांना बाहेर काढत आहे.