TOD Marathi

दुबई: युएईमध्ये रविवारपासून चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या सामन्याने आयपीएलच्या उर्वरीत पर्वाला सुरुवात झाली आहे. कोरोनामुळे मधूनच स्पर्धा स्थगित झाल्यानंतर पुन्हा सुरु होण्यासाठी अनेकजण आतुरतेने वाट पाहत होते. मात्र अफगाणिस्तानमधील क्रिकेटप्रेमींना मात्र याचा आनंद घेता येणार नाहीये. विशेष म्हणजे त्यांचे स्टार खेळाडू राशिद खान, मोहम्मद नबी यांसारखे खेळाडू खेळत असतानाही अफगाणिस्तानवासी त्यांना पाहू शकणार नाहीत.

तालिबानने अफगाणिस्तानवर स्वतःचे सरकार स्थापन केल्यापासून अनेक बदल त्यांनी इथे केले आहेत. तसेच इथले नियम कठोर पद्धतीने पाळण्याची सक्ती देखील तालिबान येथील जनतेवर करत आहे. याचाच एक प्रकार म्हणजे आता अफगाणिस्तानमध्ये आयपीएलवर बंदी घालण्यात आली आहे. आयपीएल सामने आता अफगाणिस्तानमध्ये प्रक्षेपित नाही होणार असा निर्णय तालिबानने घेतला आहे.

तालिबान सरकारच्या मते आयपीएलमध्ये अनेक अशा गोष्टी आहेत, ज्या इस्लामिक मूल्यांचं उल्लघंन करतात. यातीलच एक मोठी गोष्ट म्हणजे सामन्यांदरम्यान चीअर ली़डर्सना नाचवलं जातं. तसंच सामना पाहायला आलेल्या अनेक महिलांनी हीजाब परिधान केलेला नसतो अर्थात तोंड झाकलेलं नसतं. या सर्व कारणांमुळे आयपीएलच्या प्रक्षेपणावर तालिबानने अफगाणिस्तानमध्ये बंदी घातली आहे.