TOD Marathi

टिओडी मराठी, वॉशिंग्टन, दि. 27 ऑगस्ट 2021 – काबूलमध्ये काल एका आत्मघाती हल्ल्यामध्ये अमेरिकेचे 13 सैनिक मारले गेलेत. या सैनिकांच्या बलिदानावर बोलताना अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांच्या तोंडातून शब्द फुटणे अवघड जात होते. डोळे मिटून त्यांनी आपल्या भावनांना वाट केली. आमच्या सैनिकांची हत्या करणाऱ्यांना शोधून त्यांचा खात्मा केला जाईल, असा निर्धारही त्यांनी व्यक्‍त केला आहे.

व्हाइट हाऊसवरून राष्ट्राला उद्देशून त्यांनी भाषण केलं. त्यात त्यांनी अफगाणिस्तानातील कालच्या घटनेचा उल्लेख करीत आपल्या देशाचा शूर जवानांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली.यावेळी त्यांची अशी अवस्था झाली होती. अमेरिकेने काबूलमधून आपल्या देशाच्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम वेगाने हाती घेतले. हे काम अगदी सुरळीत सुरू होते.

आतापर्यंत अमेरिकेने तेथील 95 हजार लोकांना बाहेर काढले. पण, काल काबूल विमानतळावर हा आत्मघाती स्फोट झाला. तेथे एकूण दोन स्फोट केल्याचे सांगण्यात येते. त्यात अमेरिकेचे तेरा सैनिक मारले गेले तर अन्य अनेक जण जखमी झालेत. अफगाणिस्तानात तालिबान्यांनी सत्ता हस्तगत केल्यानंतरही तेथे अमेरिकन सैनिकांवर कोणत्याही प्रकारचा हल्ला झाला नव्हता; परंतु कालच्या घटनेने सारे चित्रच पालटून गेले. त्या पार्श्‍वभूमीवर बायडेन यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले.