TOD Marathi

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा फटका; 1 कोटी नोकर्‍या गेल्या!, शेकडो कुटुंबीयांच्या उत्पन्नात घट

टिओडी मराठी, दि. 1 जून 2021 – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचा मृत्यू झाला. तर, याचा अनेकांना फटका देखील बसला आहे. या दुसर्‍या लाटेत 1 कोटी जणांच्या नोकर्‍या गेल्या असून अनेक कुटंबीयांच्या उत्पन्नात घट झालीय. याबाबत सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी या संस्थेने सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार आतापर्यंत 97 टक्के कुटुंबीयांच्या उत्पन्नावर थेट परिणाम झाला आहे.

एप्रिल महिन्यात बेरोजगारीचा दर 8 टक्के होता. तो वाढून 12 टक्क्यांपर्यंत गेलाय. म्हणजे सुमारे 1 कोटी भारतीयांनी या कोरोना साथीत आपली नोकरी गमावलीय.

मागील वर्षी लॉकडाऊनमुळे बेरोजगारी दर 23.5 टक्क्यांवर होता. बेरोजगारी दर हा 3 ते 4 टक्के असणे ही अर्थव्यवस्थेसाठी सामान्य बाब आहे, परंतु ज्याप्रमाणे बेरोजगारी दर वाढत आहे, त्यानुसार ही परिस्थिती सुधरण्यास खूप वेळ लागणार आहे.

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी संस्थेने मागील महिन्यात 1 लाख 75 हजार कुटुंबीयांचे सर्वेक्षण केले. केवळ 3 टक्के कुटुंबीयांचे उत्पन्न वाढल्याचे आढळले आहे. तर 55 टक्के कुटुंबीयांनी उत्पन्न घटले आहे.

तसेच 42 टक्के कुटुंबीयांनी आपले उत्पन्न आहे तेवढेच आहे, असे सांगितले आहे. कोरोना संकट काळात 97 टक्के कुटुंबीयांचे उत्पन्न घटले आहे, असा अंदाज सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी संस्थेने व्यक्त केलाय.