TOD Marathi

टिओडी मराठी, लातूर, दि. 1 जून 2021 – कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी RCC या शैक्षणिक संकुलाचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी ‘स्पंदन ऑक्सिजन’ प्रकल्पाला सुमारे 2 लाख 51 हजार रुपयांची मदत केली आहे. त्यांच्या मदतीमुळे कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळ मिळणार आहे.

तसेच आगामी काळात हजारोंचे प्राण वाचविण्यात प्रा. मोटेगावकर यांचा सिंहाचा वाटा ठरणार आहे. लोकसहभागातून लातूर येथे ‘स्पंदन अक्षय संजीवनी’ या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची उभारणी केली जात आहे.

मदतीचा धनादेश सुपूर्दचा कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. यावेळी लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., प्रा. शिवराज मोटेगावकर, मिनल मोटेगावकर, डॉ. विश्वास कुलकर्णी, डॉ. आरदवाड, डॉ. वैशाली टेकाळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. आणि डॉ. विश्वास कुलकर्णी यांच्याकडे प्रा. शिवराज मोटेगावकर यांनी मदतीचा धनादेश सुपूर्द केला.

यावेळी प्रा. शिवराज मोटेगावकर म्हणाले, RCC ही नेहमीच सामाजिक कार्यासाठी तत्परतेने पुढे येत असते. तरी सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात ऑक्सिजन अभावी शेकडो रुग्णांचा मृत्यू झाला आहे, ही गंभीर बाब आहे. त्यामुळे कोरोनाविरुध्दच्या लढाईत RCC ही सर्वांसोबत आहे.

स्पंदन ऑक्सिजन प्रकल्पाला सुमारे २ लाख ५१ हजार रुपयांची मदत केली आहे. आवश्यक असेल तेंव्हा RCC कायम आपल्या सोबत असणार आहे.

यावेळी या स्तुत्य उपक्रमाला सढळ हाताने मदत केल्याबद्दल जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी प्रा. शिवराज मोटेगावकर यांचे कौतुक केले.