TOD Marathi

गेल्या दोन वर्षात कोरोना काळात लॉकडाऊनमुळे (Lockdown) राज्यांतील शाळांवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर राज्यातील शाळा लवकरच सुरू होतील अशी अपेक्षा पालकांना होती. मात्र पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने शाळा सुरू होणार की नाही याबाबत विद्यार्थ्यांसह पालकांच्या मनात संभ्रम होता. मात्र आजपासून राज्यभरात विदर्भ वगळता शाळा सुरू होणार आहे. (School reopen in Maharashtra)
शिक्षण विभागाने यासंदर्भात माहिती देत शाळा सुरु होण्याची तारीख जाहीर केली आहे. शिक्षण आयुक्तांनी पत्रक काढत विदर्भ वगळता राज्यातील शाळा 13 जूनपासून सुरु होणार असल्याचं सांगितलं आहे. विदर्भात मात्र शाळा 27 जूनपासून सुरू होणार आहेत. विदर्भ वगळता महाराष्ट्रात शाळा 13 जून रोजी सुरु होत असल्या तरी विद्यार्थ्यांना मात्र 15 जून रोजी प्रत्यक्ष शाळेत बोलावलं जावं असं आदेशात म्हटलं होतं.

शिक्षण विभागाने दिलेल्या आदेशात शैक्षणिक सत्र 2022 – 23 सुरू करण्यासाठी निर्देश दिले आहेत. राज्यातल्या शाळा पुन्हा सुरु करण्यासाठी एकवाक्यता आणि सुसंगती येण्यासाठी शिक्षण आयुक्तांनी निर्देश जारी केले. 13 आणि 14 जून रोजी शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहात शाळेची स्वच्छता, सौंदर्यीकरण तसेच कोरोना संदर्भात उद्बोधन करायचं आहे, असं आदेशात म्हटलं आहे. शाळेत येणारे विद्यार्थी तसेच पालकांचं कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगानं प्रबोधन करावं असं देखील आदेशात सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णसंख्या पाहता शाळा सुरू होणार की नाही असा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांच्या मनात होता. त्यावर बोलताना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी म्हटलं होतं की, राज्यात सध्या मास्क कुठेही बंधनकारक नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात परिस्थिती बघून शाळांसंदर्भात मास्कचा निर्णय घेतला जाईल. शाळा सुरू करण्यापूर्वी चाइल्ड टास्क फोर्स असेल किंवा आरोग्य विभाग त्यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि निर्णय घेऊ, असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं होतं.