TOD Marathi

टिओडी मराठी, हिंगोली, दि. 10 जुलै 2021 – राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या मोटारीला अपघात झाल्याची घटना घडली असून या अपघातातून त्या थोडक्यात बचावल्या आहेत. सध्या मंत्री वर्षा गायकवाड ह्या सुखरुप आहेत. मात्र, याबाबत वर्षा गायकवाड यांनी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

वर्षा गायकवाड यांच्या मोटारीला आज (10 जुलै) भरधाव टेम्पोनं पाठीमागून धडक दिली. वर्षा गायकवाड यांच्याकडे शिक्षणमंत्री पदाबरोबर हिंगोलीच्या पालकमंत्री पदाचीही जबाबदारी आहे. हिंगोलीच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला.

वर्षा गायकवाड या हिंगोलीच्या पालकमंत्री असून त्या दोन दिवसांपासून हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. हिंगोली दौऱ्यावर असताना त्यांच्या कारला टेम्पोनं मागच्या बाजूने धडक दिली. या अपघातात कुणीही जखमी झालेलं नाही. वर्षा गायकवाड हिंगोलीतील ऑक्सिजन प्रकल्पाचं उद्घाटन करुन रामलीला मैदानाची पाहणी करण्यासाठी जात होत्या.

त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या भरधाव महिंद्रा पीकअपने वर्षा गायकवाड यांच्या मोटारीला धडक दिली. यात कारचं मागच्या बाजूने नुकसान झालं आहे. सुदैवानं या अपघातात वर्षा गायकवाड यांच्यासह कुणालाही दुखापत झालेली नाही.

वर्षा गायकवाड हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पालकमंत्री म्हणून त्यांनी विविध विषय व प्रश्नांसंदर्भात बैठका देखील घेतल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यामध्ये खेळाडूंच्या सोयीसाठी नव्याने जिल्हा क्रीडा संकुलाची उभारणी केली जात आहे.

या दौऱ्यात पालकमत्री गायकवाड यांनी जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली आहे. त्यासह हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित बैठकीत जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आढावा घेतला.

त्यानंतर हिंगोलीतील नियोजित कार्यक्रमानुसार रामलीला मैदानापर्यंत जाण्यासाठी जात असताना वर्षा गायकवाड यांच्या मोटारीला अपघात झाला.

हिंगोलीत उभारला ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प :
हिंगोलीत वाढत्या ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पाच्या शुभारंभप्रसंगी वर्षा गायकवाड यांनी काँग्रेसचे स्व. नेते राजीव सातव यांच्या कार्याला उजाळा दिला आहे.

कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता हिंगोली जिल्ह्यात ऑक्सिजन क्षमतेत वाढ करणे आणि ऑक्सिजन उपलब्धतेबाबत जिल्ह्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी माझे बंधू स्वर्गीय राजीवजी सातव यांनी अतोनात प्रयत्न केले होते.

संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने ऑक्सिजन क्षमता वाढवण्यावर आमचा भर आहे. आणखी ५ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार आहेत. राजीवजी यांच्या प्रयत्नांना यश मिळवून देऊ, असं वर्षा गायकवाड यांवेळी म्हणाल्या.