पुणे: अभिनेत्री ईश्वरी देशपांडे व तिचा मित्र शुभम देडगे यांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पहाटे ५ वाजता अरुंद रस्त्यावर कारवरील नियंत्रण सुटल्याने कार झाडाला धडकली. त्यानंतर कार खाडीमध्ये कोसळल्याने त्यामधील ईश्वरी व शुभमचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. गोवा येथील अंजुना बिचकडे जाताना त्यांचा हा अपघात झाला आहे.
ईश्वरी पुण्यातील पाषाण-सुस परिसरात राहात होती तर शुभम नांदेड सिटी परिसरात राहात होता. या दोघांची अनेक वर्षापासून मैत्री होती आणि लग्नापूर्वी पुढच्या महिन्यात दोघांचा साखरपुडा होणार होता परंतु त्यापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे सध्या याबाबत दुख व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, ईश्वरीला अभिनयाची आवड होती. त्यातूनच ती मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीकडे वळली होती. काही दिवसांपूर्वीच तिची भूमिका असलेल्या मराठी आणि हिंदी चित्रपटासाठीचे शुटींग पूर्ण केले होते.