TOD Marathi

पुणे :

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव (Narayangaon area of Junnar taluka in Pune District) परिसरातील वारुळवाडी येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात उसाच्या ट्रॉलीखाली येऊन एका गर्भवती महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेनंतर मृत महिलेच्या नातेवाईकांनी टाहो फोडला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विद्या रमेश कानसकर (वय २२) असे या गर्भवती महिलेचे नाव आहे.

दोन ट्रॉली घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या मागच्या ट्रॉलीच्या चाकाखाली चिरडून या महिलेचा मृत्यू झाला. या अपघातामुळे  जन्माला येण्यापूर्वीच बाळालाही आपले प्राण गमवावे लागले आहेत. सदर अपघातानंतर नागरिक संतप्त झाले होते. या घटनेची तक्रार मृत महिलेचे पती रमेश कानसकर यांनी दिली असून ट्रॅक्टर चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. गोरक्ष सुखदेव ढेबरे असं ताब्यात घेतलेल्या चालकाचं नाव आहे. (Tractor Driver Arrested)

विद्या कानसकर (Vidya Kanaskar) या जुन्नर तालुक्यातील निमदरी येथील असून आपल्या पती व आईसोबत नारायणगाव येथे उपचारासाठी आल्या होत्या. वारूळवाडी येथून पुन्हा परतत असताना हा अपघात झाला आहे. रस्त्यात गतिरोधक आला म्हणून विद्या या गाडीवरून खाली उतरल्या. मात्र समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा विद्याला धक्का लागला. या धक्क्याने त्या खाली पडल्या आणि त्यांच्या डोक्यावरून ट्रॅक्टरचे चाक गेले. त्यानंतर उपचारासाठी विद्या यांना दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) गलथान कारभारामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. अनेक वर्षापासून या ठिकाणी रस्त्याच्या साईडपट्ट्या भरल्या गेल्या नाहीत. त्यामुळे रस्त्याला असणाऱ्या कडांवर दुचाकी घसरून अनेक अपघात होत आहेत. ६ महिन्यांपूर्वी देखील या परिसरात अशीच घटना घडली होती. त्यामुळे आणखी किती जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.