TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 25 जून 2021 – महाराष्ट्रातील विजाभजच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार आहे, अशी ग्वाही राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. वडेट्टीवार यांच्या शासकीय निवासस्थान येथे राज्यातील विजाभजच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळांच्या अडीअडचणी संदर्भात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे प्रधान सचिव जे.पी.गुप्ता, सहसचिव दे.आ.गावडे, महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा संचालक संघाचे अध्यक्ष रामदास चव्हाण यांसह पदाधिकारी आदी उपस्थित होते.

यावेळी वडेट्टीवार म्हणाले, आश्रमशाळांच्या माध्यमातून चांगले विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्न होतात. आश्रमशाळांनी मांडलेल्या समस्या सोडविण्यासाठी योग्य ती कार्यवाही केली जाईल.

प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रम शाळांचे २०२०-२१ मधील अनुदान यासह विविध मागण्यांची इतर मागास बहुजन कल्याण विभागाने पडताळणी करून तातडीने आश्रमशाळांच्या समस्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचनाही वडेट्टीवार यांनी बैठकीत दिल्यात.

विभागाचे प्रधान सचिव जे.पी.गुप्ता यांनी विजाभजच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळांच्या बाबतीत शासनाने घेतलेल्या निर्णयांची यावेळी माहिती दिली.

महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा संचालक संघाचे अध्यक्ष रामदास चव्हाण यांनी राज्य आश्रमशाळा संचालक संघातर्फे विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळांचे सन २०२०-२१ चे १०० टक्के, २०२१-२२ साठीचे ६० टक्के परिपोषण व वेतनेत्तर अनुदान तात्काळ द्यावे.

अनिवासी शिक्षकांच्या वेतनावर 8 टक्के आणि 12 टक्के वेतनेत्तर अनुदान पूर्वीप्रमाणे द्यावेत. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सहाव्या वेतन आयोगाच्या वेतनावर 8 टक्के अनुदान मिळावे.

08/08/2019 चा डायट प्लॅनचा शासन निर्णय रद्द करणे, उच्च माध्यमिक शाळांसाठी विज्ञान शाखेसाठी शिक्षक नियुक्ती यासह विविध मागण्या बैठकीत मांडल्या आहेत.