TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 25 जून 2021 – राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुका रद्द कराव्यात, अशी मागणी भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणूक आयुक्त मदान यांच्याकडे केली. मात्र, हि मागणी धुडकावत निवडणुका होणारच असे निवडणूक आयुक्त मदान यांनी सांगितले आहे.

सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे अतिरिक्त राजकीय आरक्षण रद्द केलंय. मात्र राज्य निवडणूक आयोगाने पाच जिल्हा परिषदा आणि 33 पंचायत समित्यांमधील रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. या निवडणुका रद्द करण्याची मागणी भाजपने केली आहे. मात्र, या निवडणुका होणार आहेत.

याबाबत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटल्याशिवाय जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेऊ नका, अशी मागणी आम्ही यूपीएस मदान यांकडे भेटून केली आहे. मात्र, तरीही या निवडणुका थांबणार नाही, असे त्यांनी सांगितलं आहे. सुप्रीम कोर्टाने याबाबत त्यांना निवडणूक घेण्याचे आदेश दिलेत.

मुख्य आयुक्तांना या निवडणुका घेऊ नका म्हणून सांगितलं आहे. याच धर्तीवर जर महाराष्ट्र सरकार न्यायालयात गेलं तर या निवडणुका थांबू शकतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सीताराम कुंटे यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करावी. तरच या निवडकणुका थांबवता येतील, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

महाराष्ट्र सरकारला ओबीसींची चिंता असेल, तर निवडणुकांसंदर्भात तात्काळ निर्णय घ्यावा. भाजपकडून 26 जून रोजी चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे. हे आंदोलन एका दिवसात थांबणार नाही, तर दररोज आंदोलन होईल, असे बावनकुळेंनी सांगितलं.

 • जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर :
  सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या जिल्ह्यातील ओबीसीचं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील राजकीय आरक्षण रद्द केलं होतं.

रद्द केलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या रिक्त जागांवर निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय. 5 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समित्यांमधील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालाय. 19 जुलै रोजी मतदान होणार आहे. आणि 20 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.

जाणून घ्या, किती जिल्हा परिषद जागांसाठी मतदान होतंय?
धुळे – 15
नंदूरबार – 11
अकोला – 14
वाशिम – 14
नागपूर – 16

 • किती पंचायत समिती जागांसाठी मतदान?
  धुळे – 30
  नंदूरबार – 14
  अकोला – 28
  वाशिम – 27
  नागपूर – 31