TOD Marathi

टिओडी मराठी, कोल्हापूर, दि. 23 जुलै 2021 – कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या संततधार सुरु आहे. तसेच पावसाचा जोर कमी होत न झाल्यास महापुराची शक्यता वर्तविली जात आहे. राधानगरी धरण पूर्ण भरण्यास असून 5 ते 6 फुट पाणी कमी आहे. धरण भरल्यास, स्वयंचलित दरवाजे सुरू होतील आणि आपोआप विसर्ग होऊन, नदीच्या पाणी पातळीत वाढ होईल. सध्या दर तासाला पंचगंगेच्या पातळीमध्ये अर्धा फूट वाढ होत आहे. सकाळी 9 वाजता 48.1 इंच पातळी झाली होती. रात्री बारा वाजताच पंचगंगेने 43 फुटाची धोका पातळी ओलांडलीय.

मध्यरात्रीपासूनच शहरातील कुंभार गल्ली, व्हिनस कॉर्नर आदी परिसरात पुराचे पाणी शिरले आहे. पंचगंगेला मिळणारा जयंती नदी (नाला) पुलावर पाणी आल्याने हा मार्ग बंद केला आहे.

तर पुराचा वेढा पडल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. बऱ्याच भागातील रस्ते बंद असून, विद्युत पुरवठा आणि दूरध्वनी यंत्रणा खंडित झालीय. जिल्ह्यात पुराने बाधित भागातील नागरिक आणि जनावरांना बाहेर काढणे, त्यांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणे , आवश्यक ती मदत उपलब्ध करुन देण्याचे काम एनडीआरएफच्या टीम तसेच प्रशासनाच्या वतीने रात्रभर सुरू आहे.

ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्यावर जाणारा रस्ता पुन्हा खचला आहे. यापूर्वी 2019 मध्ये आलेल्या महापुरामध्ये भूस्खलन होऊन रस्ता खचला होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने वर्षभरात हा रस्ता दुरुस्त केला होता. यंदा अतिवृष्टीमध्ये हा रस्ता पुन्हा खचल्याने किल्ल्याचा संपर्क तुटला आहे.

कोल्हापूर- पन्हाळा मार्गावर, रत्नागिरीला निघालेली कर्नाटक राज्य परिवहनची बस राजपूतवाडी जवळ पाण्यामध्ये अडकली होती. बसमधील पुरुष, महिला आणि लहान मुले अशा एकूण 25 जणांना सुखरुप बाहेर काढले आहे, यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथकाने बचाव कार्य केलं आहे. ही बस पाण्यात बुडाली आहे.

तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे पांगीरे (ता. भुदरगड) येथे पुलावर नाशिक येथे निघालेली प्रवासी वाहतूक करणारी ट्रॅव्हलर अडकली होती. यामध्ये 11 जण अडकले होते. सर्वांना सुखरुप बाहेर काढले आहे.

कागल-निपाणी महामार्ग बंद :
सांगली – कोल्हापूर बायपास रोडवर उदगाव येथील ओढ्याला बॅक वॉटरमुळे पुराचे पाणी आले आहे. तर ब्रिजवर चार फूट पाणी आल्याने बॅरिगेट्स लावून रस्ता बंद केला आहे.