टिओडी मराठी, महाड, दि. 23 जुलै 2021 – रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये मुसळधार पावसामुळे दुर्घटना घडली आहे. तळई गावावर दरड कोसळून सुमारे 32 जणांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी बचावपथक दाखल झाले आहे. बचाव आणि शोधमोहिम अजून सुरू आहे. घटनास्थळी स्थानिक नागरिकांकडून आणि प्रशासनाकडून मदत कार्य सुरूय.
मागील दोन दिवसांत रायगड आणि रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालीय. सुमारे 10 ते 15 फूट रस्त्यांवर व वस्त्यांत पाणी शिरले आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील सावित्री नदीला महापूर आला आहे. सावित्री नदीला आलेल्या महापूरामुळे महाड शहर पाण्याखाली गेलं आहे.
पोलादपूरमध्ये दरड कोसळून चौघांचा मृत्यू :
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी इथे दरड कोसळून आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झालाय. तसेच अजून 5 जण ढिगाऱ्याखाली अडकलेत. तर 4 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
या गावांना जोडणारे पितळवाडी- उमरठ फाटा पूल तसेच उमरठ फाटा ते साखर पूल हि वाहून गेल्यामुळे मदत यंत्रणा पोहोचू शकत नाही, अशी स्थिती आहे.
रत्नागिरीमध्ये आलेल्या महापुराचा फटका कोविड रुग्णालयाला बसला आहे. सुमेर 8 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक मिळाली आहे. ऑक्सिजन अभावी या रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय. या कोविड रुग्णालयाला चारीबाजुंनी पाण्याने वेढल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय.
चिपळूणमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झालीय. यामुळे चिपळूणच्या अपरांत कोविड सेंटरलाही चहूबाजुंनी पाण्याने वेढलंय. याच कोविड रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या सुमारे 8 रुग्णांचा मृत्यू झालाय.