TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 23 जुलै 2021 – अद्यापही कोकणामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. चिपळूण आणि महाड इथल्या पूरस्थितीने रौद्र रुप धारण केलं आहे. हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकलेत. बचाव आणि मदतकार्य सुरु केले आहे. त्यातच आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने परिस्थिती आणखी बिकट होत आहे, असे समजत आहे. येथेही बचाव कार्य सुरु आहे.

सह्याद्रीच्या खोऱ्यात ढगफुटी झाल्याने कर्ली आणि तेरेखोल नदीला पूर आलाय. नदीकाठाची अनेक गाव पाण्याखाली गेलीत. माडखोल, सावंतवाडी आंबोली मार्गावर तीन ते चार फूट पाणी आलंय. दोडामार्ग तिलारी नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक गावे पाण्याखाली गेलीत.

यादरम्यान, राज्यामध्ये मुसळधार पावसाने हाहा:कार उडवलाय. कोकणातील चिपळूण, महाड आणि खेड, संगमेश्वर येथे पूरस्थिती कायम आहे. कोल्हापूर आणि सांगलीत पुराचा धोका वाढलाय. सांगली इथल्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत अचानकपणे वाढ झाल्यामुळे नागरिकांना सर्तकतेचा इशारा दिला आहे.

आयर्विन पुलाची पाणीपातळी 38 फुटांवर पोहोचलीय. शहरातील 50 कुटुंबांचे तातडीने स्थलांतर केलं आहे. नदीकाठच्या उपनगरात पाणी शिरले आहे. तर अनेक नागरिकांनी स्वतः स्थलांतर सुरु केलं आहे.

कोयना धरण क्षेत्रात तुफान पाऊस सुरु आहे. त्यामुळे धरणातून विसर्ग सुरू केल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत अचानकपणे वाढ झाल्याने सांगली शहरातील सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, कर्नाळ रोड, दत्तनगर परिसर या भागात पुराच पाणी शिरले आहे, त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावण पसरले आहे.