TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 24 जून 2021 – नुकतीच दिल्लीत तिसऱ्या आघाडीची बैठक झाली. त्यामुळे आता राजकारण सुरु झाले आहे. काँग्रेसची प्रदेशाध्यक्षपदाची धुरा हाती आल्यापासून काँग्रेस नेते नाना पटोले आक्रमक झालेत. आगामी काळातील सर्वच निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावरच लढवेल, असे नाना पटोले यांनी सांगितल्याने सध्या एकच गोंधळ निर्माण झालाय. मात्र, हे सुरु असताना नानांना तातडीने दिल्लीला बोलविले आहे. त्यामुळे नाना पटोले यांनी उत्तर महाराष्ट्रात सुरु असलेला दौरा अर्ध्यावर सोडला आहे. तसेच ते उद्या दिल्लीसाठी रवाना होणार आहेत, असे समजते.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आहे. मात्र, या पुढील निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढविणार आहे. त्यासाठी काम सुरू आहे. तसेच, विधानसभा अध्यक्ष हा काँग्रेसचा असेल, येत्या पावसाळी अधिवेशनात त्याची निवड होणे अपेक्षित आहे. मात्र, ही निवड होण्यासाठी सर्व आमदार सभागृहामध्ये असणे अपेक्षित असते.

मागील अधिवेशनात अनेक आमदार कोरोनामुळे येऊ शकले नाहीत, असे त्यांनी जळगावमधील दौऱ्यात असताना सांगितले होते. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षांची निवड आणि आगामी निवडणुकासंदर्भात चर्चा करण्यासाठी नाना पटोले शुक्रवारी दिल्लीसाठी रवाना होणार आहेत, अशी काँग्रेसच्या सूत्रांची माहिती आहे.

काँग्रेसचे नाना पटोले आज धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे दौऱ्यावर आहेत. काँग्रेस पक्षाला बळकटी देण्यासाठी तसेच कार्यकर्त्यांमध्ये आगामी निवडणुकांसाठी रणनिती ठरवून उत्साह वाढविण्यासाठी ते दौऱ्यावर आहेत. आपल्या दौऱ्यामध्ये ते सातत्याने स्वबळाचा नारा देत आहेत.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्लीमध्ये भाजपविरोधी प्रमुख पक्षातील नेत्यांची बैठक घेतली. तसेच, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचीही बैठक त्यांनी घेतली आहे.

तसेच निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या देखील दिल्लीत चर्चा केली. त्यामुळे, देशातील राजकारण तिसऱ्या आघाडीची चर्चा जोर धरतेय. तर, राज्यातील महाविकास आघाडी सरकारची देखील चर्चा दिल्लीच्या राजकारणामध्ये रंगत आहे.