TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 24 जून 2021 – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जेलिटीनच्या कांड्यांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळल्यापासून सुरु झालेल्या सचिन वाझे प्रकरणाला दररोज नवे वळण मिळत आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर आता सचिन वाझेनेच आणखी एका पत्रातून स्फोट केलाय. या प्रकरणी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून या प्रकरणी अजित पवार यांची चौकशी करावी, अशी भाजपकडून मागणी केली जात आहे. त्यासाठी भाजपकडून प्रस्ताव मंजूर केला आहे.

सचिन वाझेने मीडियाला 3 पानांचे पत्र शेअर केलं आहे. त्यात शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब यांनीही खंडणी मागितल्याचा आरोप केलाय. त्यावरुन आता भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकत्र येऊन अजित पवार यांनी दोन दिवसांचं सरकार बनवलं होतं. त्यामुळे भाजपसोबत अजित पवार यांचे संबंध आजही चांगले आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

मात्र, सचिन वाझे प्रकरणावरुन आता भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. याप्रकरणी अजित पवार यांची सीबीआय चौकशी करावी, अशा मागणीचा प्रस्ताव भाजपच्या प्रदेश कार्यकारणीत मंजूर केला आहे. त्यामुळे, भाजपकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीची मागणी केली जात आहे.