TOD Marathi

चंद्रपूर: देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला हा डाव त्यांच्यावरच उलटणार, असा दावाच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआयच्या माध्यमातून केंद्र सरकार राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. या सर्व यंत्रणांचा अतिरेकी वापर सुरू असल्याची टीका त्यांनी यावेळ केली आहे. ते चंद्रपूर येथे बोलत होते.

महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं, या मेळाव्याला भुजबळ यांनी उपस्थिती लावली होती. केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून त्रास देण्याचं काम करत आहे. सरकार अस्थिर करण्याचा हा प्रयत्न आहे. परंतु, भाजप यंत्रणांच्या बळावर सरकार बनवू शकत नाही, असं सांगतानाच राज्यातील आघाडी सरकार भक्कम असल्याचा दावा भुजबळ यांनी केला आहे.

दरम्यान, काल भुजबळांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं होतं. ओबीसी समाजावर सातत्याने अन्याय होत आला आहे. ओबीसींच्या प्रश्नांवर जो बोलतो त्याला त्रास देण्याचे काम सुरू आहे. मात्र कितीही त्रास दिला तरी ओबीसींच्या प्रश्नांसाठी बोलतच राहणार, असे त्यांनी सांगितलं.