TOD Marathi

वर्षावर Political घडामोडींना वेग, Sharad Pawar यांचे निकटवर्ती मंत्रीही CM यांच्या भेटीला, तर मुख्यमंत्री Routine Checkup साठी रुग्णालयात

टिओडी मराठी, मुंबई, दि. 29 जून 2021 – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर राष्ट्रवादीचे मंत्री दाखल झाले आहेत. इथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत महत्त्वाची बैठक होणार आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे शरद पवार यांच्या निकटवर्ती मंत्री असून तेही वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे हे देखील वर्षावर उपस्थित आहेत.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने समन्स बजावलं आहे. मात्र, देशमुख यांनी प्रत्यक्ष चौकशीला येण्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशी घेण्याची विनंती केलीय. याशिवाय त्यांनी ७ दिवसांची मुदत मागितली आहे, ईडीने त्यास परवानगी दिली आहे.

जर ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीअंती अटक केली तर महाविकास आघाडीसाठी हा सर्वात मोठा धक्का बसणार आहे. सरकारचे डॅमेज कंट्रोल, ईडी चौकशीला कसं सामोरं जायचं?, या सर्व पार्श्वभूमीवर वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसोबत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची चर्चा होईल, असा अंदाज आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ३ दिवसात दोनवेळा भेट घेतली आहे. संजय राऊत काल वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत. त्यानंतर तिथून संजय राऊत हे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले होते. संजय राऊत हे दोन दिवसात सातत्याने महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेत आहेत.

तीन दिवसापूर्वी संजय राऊत व उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर दोन तास चर्चा झाली. त्यानंतर आज दोन्ही नेत्यांत तासभर खलबतं झाली. या चर्चेनंतर संजय राऊत शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर आले होते. त्यामुळे महाविकास आघाडीत नेमकं काय चाललंय?, याचे अनेक तर्क वितर्क राजकीय वर्तुळात बांधले जात आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात
या दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या भेटीगाठी होत असल्या तरी, उद्धव ठाकरे आज रुटीन चेकअपसाठी रिलायन्स रुग्णालयामध्ये पोहोचले आहेत. उद्धव ठाकरे हे मुंबईतील HN रिलायन्स रुग्णालयात आज सकाळी दाखल झाले.

उद्धव ठाकरे हे स्वत: ड्रायव्हिंग करत रुग्णालयामध्ये आले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची प्रकृती उत्तम आहे, असं दिसतंय. केवळ रुटीन चेकअप म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रुग्णालयात दाखल झालेत.