TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 25 जुलै 2021 – कोकण भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांचे प्रचंड नुकसान झालं आहे. यात अधिक प्रमाणात जीवितहानी झाली आहे. काही भागात दरड कोसळून 50 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि अकोला या जिल्ह्यांत पावसाने हाहाकार माजविला आहे. मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे आता नुकसानाची पाहणी करत आहेत. यावरून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. राणे म्हणाले, आता कुठे घरातून डिस्चार्ज मिळाल्यावर ते फिरत आहेत.

राज्य सरकारची लोकं भेटत नाहीत, बोलत नाहीत. आता कुठे घरातून डिस्चार्ज झाला आहे, म्हणून आता फिरत आहेत, असे म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीय.

रायगड जिल्ह्यामधील तळीये गावावर दरड कोसळली होती. पाहणीसाठी नारायण राणे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आलेत. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या नुकसानाची माहिती देणार आहे. मी येताना तसे पंतप्रधानांशी बोलून आलो आहे. त्यांनी मला अहवाल सादर करायला सांगितलं आहे, नारायण राणेंनी म्हटलंय.

राज्याकडून मदत मिळाली असली तरी आणखी मदत होणार आहे. या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांचे पूनर्वसन पंतप्रधान आवास योजनेतून केलं जाणार आहे. त्यांना चांगली आणि पक्की घरे दिली आहेत, असे नारायण राणे यांनी सांगितलं आहे.