TOD Marathi

टिओडी मराठी, दिल्ली, दि. 28 जुलै 2021 – दिल्ली दौऱ्यावर असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधलाय. आता संपूर्ण देशात खेला होबे होणार असून २०२४ सालची निवडणूक मोदी विरुद्ध संपूर्ण देश अशी रंगणार आहे, असे विधान ममता बॅनर्जी यांनी केलंय.

विरोधी पक्षाचे कमान तुम्ही सांभाळणार का? असा विचारलं असता “मी काही राजकीय ज्योतिषी नाही. हे पूर्णपणे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. आज माझी सोनिया गांधी आणि अरविंद केजरीवाल यांच्यासोबत बैठक आहे. संसदेच्या सत्रानंतर विरोधी पक्षांची बैठक व्हायला हवीय, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

विरोधी पक्षाचे गणित हे राजकीय पक्षांवर अवलंबून आहे. जर कुणी याचं नेतृत्व करणार असेल तर मला काही हरकत नाही. मी कुणावरही माझं म्हणणं लादू इच्छित नाही. सध्या अनेक राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. याबाबत संसदीय अधिवेशनानंतर प्रमुख पक्षांसोबत बैठक घेऊन चर्चा करूया, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

पुढील 6 महिन्यांमध्ये परिणाम दिसतील – ममता बॅनर्जी
सोनिया गांधी आणि अरविंद केजरीवाल यांच्याशी भेट होणार आहे. लालू यादव यांच्याशीही चर्चा झालीय. सर्वजण एकत्र येऊ इच्छित आहेत. सोनिया गांधी विरोधी पक्षांनी एकत्र यावं, या भावनेच्या आहेत.

त्यांच्यासोबतच्या बैठकीत याबाबत चर्चा करणार आहे. विरोधी पक्ष म्हणून सर्वजण एकत्रितरित्या गांभीर्याने काम करू लागलो तर, येत्या ६ महिन्यांमध्ये याचे परिणाम दिसतील, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.

देशातल्या सर्वच विरोधी पक्षाच्या नेत्यांशी माझे चांगले संबंध आहेत. जर येत्या काळामध्ये राजकीय वादळ निर्माण झालं तर त्याला कुणीच थांबवू शकत नाही.

आता ‘खेला होबे’चा नाद संपूर्ण देशात घुमणार आहे. आतापर्यंत ‘अच्छे दिन’ची वाट खूप पाहिली आहे. आम्हाला ‘सच्चे दिन’ पाहायचे आहेत, असं देखील ममता बॅनर्जी म्हणाल्या.