TOD Marathi

टिओडी मराठी, लखनौ, दि. 28 जून 2021 – उत्तर प्रदेश राज्यात बहुजन समाज पक्ष एमआयएमबरोबर आघाडी करणार आहे, असे वृत्त काही ठिकाणी प्रसारित झाले आहे. मात्र, याचा बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी साफ इन्कार करून याबाबत खुलासा केला आहे. याबाबत त्यांनी ट्‌विट करून उत्तर प्रदेशामध्ये एमआयएमबरोबर आघाडी नाही, असे स्पष्ट सांगितले आहे.

बहुजन समाज पक्ष उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांतील निवडणुका स्वबळावर लढविणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केलं आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षानेही स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घोषित केलाय.

त्यामुळे कॉंग्रेसलाही स्वबळावर तेथे लढल्याशिवाय पर्याय नाही. उत्तर प्रदेशातील मागील लोकसभा निवडणुकांमध्ये बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पार्टी यांच्यामध्ये आघाडी झाली होती. पण, त्यांच्या पदरी साफ निराशा आली होती.

विधानसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेस व समाजवादी पार्टी यांच्यातही आघाडी झाली होती. पण, त्यावेळीही त्यांच्या पदरी निराशा आली होती. आता तर तेथे सर्वच पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीमध्ये आहेत.