Devendra Fadnavis हे फकीर होण्याची भाषा करत असतील तर मी स्वत: त्यांची भेट घेईन – Sanjay Raut

टिओडी मराठी, मुंबई, दि. 28 जून 2021 – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे भाजपचे लढवय्ये नेते आहेत. त्यांचे राजकीय भविष्य उज्ज्वल आहे. त्यांना संन्यासाची भाषा शोभत नाही. ते फकीर होण्याची भाषा करत असतील तर मी स्वत: त्यांची भेट घेईन, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलीय. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. तीन ते चार महिन्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करुन दिलं नाही तर राजकारणातून संन्यास घेईन, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावर संजय राऊत यांनी भाष्य केलंय.

यावेळी संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना संन्यास घेऊ देणार नाही. त्यांची महाराष्ट्र, देशाला गरज आहे. त्यांची वीरक्तीची भाषा हा महाराष्ट्रावर अन्याय होईल. चांगल्या नेतृत्त्वाचा राजकारणात तुटवडा आहे. फडणवीसांसारख्या हरहुन्नरी नेत्यांना फकीर होण्याची भाषा योग्य नाही. फडणवीस लढवय्ये नेते आहेत.

देवेंद्र फडणवीस भाजपचे लढवय्ये आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांना सहकार्य करावे, संन्यास वगैरे घेण्याची भाषा करु नये. त्यासाठी मी त्यांना स्वत: भेटून त्यांना सांगेन तुमचं राजकीय भाषा उज्ज्वल आहे म्हणून, असे संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्रात तीन पक्षांची महाविकास आघाडी आहे. तिन्ही पक्ष स्वतंत्र आहेत, त्यांच्या राजकीय विचारधारा वेगळ्या असल्या तरी किमान समान कार्यक्रमानुसार सरकार सुरुय. भांड्याला भांडं लागणार, ते लागायलाही हवं, तरच संसार टिकतो.

भाजप-शिवसेना युती सरकारमध्येही भांड्याला भांडी लागत होती, असं नाही तर भांडी फुटत होती, तरीही सरकार ५ वर्ष टिकलं. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारही पाच वर्ष पूर्ण करेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केलाय.

Please follow and like us: