TOD Marathi

टिओडी मराठी, चेन्नई, दि. 7 मे 2021 – देशात नुकत्याच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या. यातील तामिळनाडू विधानसभा निवडणुकीमध्ये अपेक्षेप्रमाणे सत्तांतर झाले आहे. या राज्यातील सरकारची सूत्रे अद्रमुक पक्षाकडून द्रमुक पक्षाकडे गेली आहेत. आज (शुक्रवार) द्रमुकचे प्रमुख एम.के. स्टालिन यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

एका वृत्त संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, चेन्नई येथे राजभवनामध्ये राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी स्टालिन यांना शपथ देण्यात आली. त्यांच्यासमवेत मंत्रिमंडळातील ३३ मंत्र्यांनीही शपथ घेतली आहे. पक्षाचे नेते दुराई मुरुगन यांनी जलसंपदा मंत्री म्हणून शपथ घेतली. यावेळी एमके स्टालिन यांनी मुख्यमंत्री पदासमवेत राज्याचे गृहमंत्री म्हणून हि शपथ घेतली आहे.

२ मे रोजी झालेल्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालात द्रमुकने एआयडीएमकेची सत्ता उलथून टाकली आहे. एमके स्टालिन यांच्या नेतृत्वात असलेल्या द्रमुकला तामिळनाडूच्या राजकीय इतिहासामध्ये सहाव्या वेळी सत्तेत बसण्याची संधी मिळालीय.

या दरम्यान, तामिळनाडू विधानसभा निवडणुकीमध्ये द्रमुक पक्षाने येथे कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांशी आघाडी केली होती. हा यूपीए आघाडीचा भाग मानला जातोय. द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीला तामिळनाडू राज्यात स्पष्ट बहुमत मिळालेले आहे.

मात्र, द्रमुक पक्षाला एक्‍झिट पोलमध्ये जितक्‍या प्रमाणात बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तविला होता. तो मात्र प्रत्यक्षात आला नाही. द्रमुकला दोन तृतीयांश बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तविला होता. पण, प्रत्यक्षात द्रमुकला मिळालेले यश हे माफक स्वरूपाचे आहे.

भाजपने या तामिळनाडू राज्यात सत्तारूढ अद्रमुक पक्षाशी युती केली होती. पण, त्यांना सत्तेवरून पाय उतार व्हावे लागले. भाजपचे या राज्यातील अस्तित्व याही वेळी नगण्य राहिले आहे. तथापि, अद्रमुक आघाडीने पराभूत होऊनही येथे जी लक्षणीय लढत दिली आहे, ती कौतुकास्पद ठरलीय. जयललिता यांच्या निधनानंतर हा पक्ष येथे प्रथम सार्वत्रिक निवडणुकीला सामोरा गेला आहे.