TOD Marathi

टिओडी मराठी, लखनऊ, दि. 6 सप्टेंबर 2021 – उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल अझीज कुरेशी यांच्याविरोधात उत्तर प्रदेश पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलाय. हा गुन्हा रविवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरुद्ध अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी नोंदवला आहे.

भाजप कार्यकर्ता आकाश सक्सेना यांच्या तक्रारीवरून रामपूर जिल्ह्यातील सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यामध्ये कुरेशीविरोधात गुन्हा दाखल केला आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे.

आपल्या तक्रारीत आकाश सक्सेना यांनी म्हटले की, माजी मंत्री आझम खान यांच्या घरी त्यांची पत्नी आणि रामपूरच्या आमदार तंझीम फातिमा यांना भेटण्यासाठी उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल अझीज कुरेशी गेले होते.

त्यांनी जिथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारची तुलना सैतान व रक्त शोषक राक्षस अशी केली होती. कुरेशी यांचे हे वादग्रस्त वक्तव्य दोन समुदायात तणाव निर्माण करू शकते आणि जातीय दंगली घडवून आणू शकते, असा आरोप तक्रारकर्त्याने केलाय.

एफआयआरच्या कॉपीनुसार, कलम १५४ ए अंतर्गत राजद्रोह, १५३ ए अंतर्गत जाती-धर्मातील वैर वाढवणे आणि राष्ट्रीय एकता आणि अखंडतेविरोधात वक्तव्य केल्याबद्दल १५३ बी अंतर्गत माजी राज्यपालांवर गुन्हा दाखल केलाय. तसेच लोकांत भ्रम आणि दहशत पसरवण्यासाठी देखील गुन्हा दाखल केला आहे.