टिओडी मराठी, कोलकाता, 29 ऑगस्ट 2021 – पश्चिम बंगाल राज्यातील कथित कोळसा घोटाळ्याशी संबंधित वसुली प्रकरणामध्ये ईडीने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा खासदार अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नीला चौकशीसाठी बोलावले आहे, अशी माहिती शनिवारी अधिकाऱ्यांनी दिलीय. लोकसभेतील डायमंड हार्बर जागेचे अभिषेक बॅनर्जी प्रतिनिधित्व करत असून तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीसही आहेत.
या प्रकरणाच्या तपासासाठी त्यांना सप्टेंबरमध्ये हजर राहण्यास सांगितले आले आहे, तर त्यांची पत्नी रुजीराला मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) असेच समन्स पाठवले आहे. या प्रकरणाशी जोडलेल्या काही इतरांनाही पुढील महिन्यामध्ये वेगवेगळ्या तारखांना हजर राहण्याचे समन्स दिलेत.
पीएमएलएच्या फौजदारी कलमांखाली दाखल केलेला गुन्हा, ईडीने नोव्हेंबर, २०२० मध्ये केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) च्या एफआयआरचा अभ्यास केल्यानंतर दाखल केला होता, ज्यात आसनसोल आणि आसपासच्या राज्यातील कुनुस्टोरिया व काजोरा भागातील ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड खाणींशी संबंधित कोट्यावधी रुपयांच्या कोळसा चोरीचा घोटाळा होता.
स्थानिक राज्य संचालक अनुप माझी ऊर्फ लाला यात मुख्य संशयित असल्याचा आरोप आहे. या बेकायदेशीर व्यापारातून मिळालेल्या निधीचे अभिषेक बॅनर्जी लाभार्थी असल्याचा दावा ईडीने याअगोदर केला होता. आत्तापर्यंत त्यांनी सर्व आरोप फेटाळलेत.