TOD Marathi

नेपाळमधील प्रवाशांनी भरलेल्या बेपत्ता विमानाचा अखेर शोध लागला आहे. हिमालयातील मानापाथीच्या खालच्या भागात हे विमान दिसल्याची माहिती नेपाळ लष्कराने दिली आहे. त्याचवेळी मुस्तांगच्या कोबानमध्ये विमानाचे अवशेष सापडल्याची माहिती समोर येत आहे.

नेपाळमधील एका खाजगी विमान कंपनीचे छोटे प्रवासी विमान क्रॅश झाले असून त्यात चार भारतीयांसह २२ जण होते. तारा एअरच्या विमानाने पोखरा येथून सकाळी 9.55 वाजता उड्डाण केले आणि 15 मिनिटांनी कंट्रोल टॉवरशी संपर्क तुटला, असे एअरलाइनच्या प्रवक्त्याने सांगितले. अपघातग्रस्त विमान नंतर कोवांग गावात सापडले. मात्र, विमानातील प्रवासी सुरक्षित आहेत की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराच्या अधिकाऱ्यांना दूरवरून धूर निघताना दिसला, त्यानंतर विमानाचा शोध लागला.

एएनआय ने दिलेल्या माहितीनुसार, मुस्तांगमधील कोबानजवळ विमानाचे अवशेष सापडले आहेत. नेपाळी लष्कराच्या एमआय-17 हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात येत आहे. मात्र, खराब हवामानामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, तारा एअरचे विमान लामचे नदीच्या तोंडावर मानपाथी हिमाल खालच्या भागात कोसळले. नेपाळ लष्कर जमिनीवरून आणि हवाई मार्गाने घटनास्थळाकडे जात आहे, असे लष्कराच्या वतीने सांगितले अशी माहीतीही ANI ने दिली आहे.