TOD Marathi

पुण्यात BA- 4 आणि BA- 5 या करोनाच्या नव्या व्हेरीएंटचे एकूण 7 नवे रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली होती. मात्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घाबरुन न जाण्याचं आवाहन केलं आहे. सातही रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्याची दिलासादायक माहिती त्यांनी दिली. पण गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचा सल्ला आरोग्यमंत्र्यांनी नागरिकांना दिला आहे.

सातपैकी बहुतांश रुग्णांनी कोरोना लसीचे दोन्हीही डोस घेतले असून त्यामुळेच त्यांना कोणताही त्रास झाला नाही. या दोन्हीही व्हेरीएंटच्या सातही रूग्णांना दवाखान्यातुन सुट्टी देण्यात आल्याचं टोपे यांनी म्हटलं आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची लागण झालेल्या सातपैकी दोघे जण हे दक्षिण आफ्रिका आणि बेल्जिअम येथे प्रवास करुन आल्याची माहिती आहे. तसेच, तिघे जण कर्नाटक आणि केरळातून आल्याची माहिती आहे. तर इतर दोघा जणांनी कुठेही प्रवास केल्याची नोंद नाही. भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने (आयसर) केलेल्या जनुकीय तपासणीत हे नवे व्हेरियंट आढळले असून इंडियन बायोलॉजिकल डेटा सेंटर (आयबीडीसी) फरिदाबाद या संस्थेने याची पुष्टी केली आहे.

अलिकडे राज्यात करोना रुग्णसंख्या वाढत असून नागरिकांची चाचणी घेण्याचं प्रमाण वाढवण्यात आल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. ज्या नागरिकांचे दोन डोस झालेले नाहीत, त्यांनी लसीकरण पूर्ण करून घ्यावे, तसेच बूस्टर डोसही घ्यावा असं आवाहन देखील टोपे यांनी केलं.