TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 10 जुलै 2021 – पेट्रोल – डिझेलच्या दरात होत असलेल्या वाढीमुळे वाहतूक खर्च वाढलाय. या वाढलेल्या वाहतूक खर्चाचा विचार करुन दूध कंपन्यांनी दुधाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतलाय. अगोदर ‘अमूल’ व आता ‘गोकुळ’च्या दूधाचे विक्रीचे दर वाढविले आहेत. ‘मदर डेअरी’ने केवळ दिल्ली एनसीआर परिसरामध्येच त्यांच्या दुधाच्या दरात वाढ केल्याचे जाहीर केले आहे.

‘अमूल’ने १ जुलै २०२१ पासून अमूल गोल्ड, अमूल शक्ती, अमूल ताजा, अमूल टी स्पेशल, अमूल स्लिम अँड ट्रिम यांच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ केलीय. सुमारे दीड वर्षांनंतर ‘अमूल’ने दूधाच्या दरात वाढ केलीय.

‘अमूल’ पाठोपाठ ‘गोकुळ’ने दुधाचे दर वाढविले. ‘गोकुळ’च्या दुधाचे विक्रीचे दर रविवार ११ जुलै २०२१ पासून वाढविणार आहेत. ‘गोकुळ’चे दूध लिटरमागे दोन रुपयांनी वाढविणार आहे.

तसेच शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करण्याच्या दरातही ‘गोकुळ’ने वाढ केलीय. यामुळे शेतकऱ्यांना म्हशीच्या दुधासाठी ‘गोकुळ’कडून लिटरमागे दोन रुपये अधिक मिळणार आहेत.

तसेच शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी ‘गोकुळ’कडून लिटरमागे एक रुपया अधिक मिळणार आहे. शेतकऱ्यांना म्हशीच्या दुधासाठी रविवार ११ जुलै २०२१ पासून लिटरमागे ३९ ऐवजी ४१ रुपये मिळतील तर, गायीच्या दुधासाठी २६ ऐवजी २७ रुपये मिळतील.