TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 4 मे 2021 – देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपल्यानंतर पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सुमारे 66 दिवसांनंतर वाढ झाली, असून पेट्रोल 15 पैशांनी तर, डिझेल 18 पैशांनी वाढले आहे.

27 फेब्रुवारीनंतर देशात पहिल्यांदा इंधनाची दरवाढ झालेली आहे. पश्चिम बंगालसह 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका असल्यामुळे इंधनाच्या किंमती ‘जैसे थे’ ठेवल्याचे आढळून आले होते.

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती या दोन महिन्याच्या काळात वाढल्या आहेत. देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ केली नव्हती. यामागे सहाजिक 5 राज्यातील निवडणुका हे कारण होते. आता निवडणुका संपल्यानंतर लगेचच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे.

आता झालेली इंधन दरवाढ पुन्हा सामान्यांच्या खिशाला कात्री लावणार आहे. असेच दिसत आहे. आता या पुढे दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे, असे, काही विश्लेषकांकडून सांगितले जात आहे.

मुंबईमध्ये पेट्रोलच्या दरात वाढ होऊन ती 96.95 रुपये, तर डिझेलची आजची किंमत ही 87.98 रुपये एवढी झालीय. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल आता 90.55 रुपये एवढे झाले आहे तर, डिझेल 80.91 रुपये एवढे झाले आहे.

15 जून 2017 पासून देशात इंधनाचे दररोज बदलण्यास सुरुवात झालीय. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आता भारतातील तेल कंपन्या ठरवत असतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षणाला तेलाच्या किंमती बदलतात. त्यामुळे देशात आता पेट्रोल व डिझेलच्या किंमती दर दिवशी सकाळी सहा वाजता बदलत असतात.